मुंबईतील साठ्ये महाविद्यालयात खळबळ; 21 वर्षीय विद्यार्थीनीची 3ऱ्या मजल्यावरुन आत्महत्या की हत्या?
Mumbai Crime News : मुंबईतील प्रसिद्ध साठ्ये महाविद्यालयात (Sathaye college) गुरुवारी मोठी खबळबळजनक घटना घडली. या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीने महाविद्यालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (girl Suicide News) केली.
संध्या पाठक असे मृत तरुणीचे नाव असल्याचे समोर आले आहे. नेमकी तिने महाविद्यालयाच्या इमारतीवरुन आत्महत्या का केली, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. या घटनेने मात्र मुंबईत खळबळ उडालेली आहे. दुसरीकडे, मात्र, तिच्या कुटुंबियांकडून ही आत्महत्या नाही तर घातपात असल्याचा दावा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्या पाठक ही साठ्ये महाविद्यालयात स्टॅटिस्टिक्स (अंकशास्त्र) विभागात तिसऱ्या वर्षाला शिकत होती. ती गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली. पण महाविद्यालयाच्या सकाळच्या सत्राची लगबग सुरू असताना संध्या महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर चढली अन् काही क्षणातच तिने वरून उडी मारली, यात तिचा मृत्यू झाला.

कॉलेज प्रशासनाकडून काय करण्यात आता दावा!
दुसरीकडे, संध्याने आत्महत्या केली की तिला कोणी ढकलून दिले, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. परंतु, महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून संध्याने आत्महत्या केली असल्याचे सांगितले आहे. परंतु, तिच्या वडिलांना प्रशासनाचा हा दावा मान्य नाही. तिचा घातपात झालेला असावा, असा आरोप तिच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. त्यामुळे या घटनेत आता आत्महत्या की हत्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता पोलिस तपासांत नेमकं काय पुढे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
साठ्ये कॉलेजमध्ये काय घडलं?
संध्या पाठक ही गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजला आली होती. यानंतर सर्वजण वर्ग सुरु झाल्यानंतर आतमध्ये जाऊन बसले. मात्र, संध्या पाठक ही कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. कोणालाही पत्ता लागण्यापूर्वी संध्याने तिसऱ्या मजल्यावरुन उडी टाकली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. खाली पडल्यानंतर संध्याच्या शरीरातून मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाला. तिला तातडीने जवळच्या बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सीसीटीव्ही फुटेज, तपासाचा महत्त्वाचा दुवा!
संध्या पाठक ही अवघ्या 21 वर्षांची होती. तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.परंतु, तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, आमची मुलगी आत्महत्या करु शकत नाही, तिच्याबाबत घातपात झाला असावा.
पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज घेतले
पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला आहे. महाविद्यालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. यापैकी एका कॅमेऱ्यात संध्या पाठक ही तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसत आहे. मात्र, त्यानंतर तिने नेमकी कशी उडी मारली, त्यावेळी तिच्यासोबत कोणी होते का, हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
साठ्ये महाविद्यालयातील कॉरिडोअरमध्ये असणाऱ्या भिंती बऱ्यापैकी उंच आहेत. त्यामुळे संध्या चुकून तोल जाऊन खाली पडण्याची शक्यता फारच कमी आहे. तसेच साठ्ये कॉलेजच्या प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यापैकी एकातरी कॅमेऱ्यात तिने उडी मारतानाचे दृश्य चित्रित झाले असावे, असा अंदाज आहे. त्यामुळे पोलिस तपासात काय निघते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.












Click it and Unblock the Notifications