ती तर वैरीण निघाली: बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने केले पतीचे कांड,पोटाची नस अन् हाड मोडेपर्यंत मारलं
Mumbai Crime Latest News : मुंबईत एक थरारक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. जी एखाद्या क्राईम थ्रिलर कथेलाही लाजवेल. गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरात एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या पतीचा जीव घेतला. पत्नीच्या मित्राने तिच्या नवऱ्याला इतके मारले की, त्याच्या पोटाची नस तुटली तर छातीचे हाडं मोडलं. इतकं वाईटपद्धतीने त्याची हत्या केली.
विशेष म्हणजे, हा क्रूर कट तिच्याच 12 वर्षांच्या मुलीसमोर रचण्यात आला, आणि या घटनेची साक्षही त्याच निष्पाप मुलीने दिली. मृत पती भरत अहिरे (वय 40 हे चित्रपटसृष्टीतील मेकअप आर्टिस्ट होते. नेमकी ही थरारक घटना कशी घडली आणि ती पुढे कशी आली, याविषयी सविस्तर माहिती पोलिसांनी दिली आहे. चला तर जाणून घेऊया ही क्रुर क्रौर्याची कहाणी.

क्रौर्याची कहाणी: प्रेमसंबंधातून रचला कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत अहिरे यांची पत्नी राजश्री अहिरे (वय ३५) हिचे चंद्रशेखर नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या अनैतिक संबंधांमुळे भरत आणि राजश्री यांच्यात नेहमीच वाद होत असत.
या वादांना कंटाळून राजश्रीने आपल्या पतीला कायमचे संपवण्याचा कट रचला. १२ जुलैच्या रात्री तिने प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगा यांना फोन करून घरी बोलावले.
भरतच्या १२ वर्षांच्या मुलीने, श्रेयाने, पोलिसांना दिलेल्या जबाबानंतर ही घटना उजेडात आली. श्रेयाने सांगितले की, "आईने बाबांना शौचालयाजवळ बोलावले. तिथेच प्रियकर चंद्रशेखर आणि रंगाने बाबांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली."
या मारहाणीत भरतच्या पोटातील नस तुटली, छातीची हाडे मोडली आणि यकृताला गंभीर दुखापत झाली. ही घटना डोळ्यांदेखत घडत असतानाही, राजश्रीने आपल्या मुलीला गप्प बसण्यास भाग पाडले.
तीन दिवस घरात कोंडून ठेवले, उपचार नाकारले
मारहाणीनंतर गंभीर जखमी झालेल्या भरतला रुग्णालयात नेण्याऐवजी, राजश्रीने त्याला घरातच तीन दिवस कोंडून ठेवले. तिने भरतला धमकावले की, जर त्याने कोणालाही याबाबत सांगितले, तर ती मुलांनाही मारून टाकेल. या क्रूर कृत्यामुळे भरतची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली.
१६ जुलै रोजी भरतची अवस्था खूपच गंभीर झाल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी पाच ऑपरेशन्स करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा उपयोग झाला नाही आणि ५ ऑगस्ट रोजी भरतचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुलीच्या जबाबाने उघड झाले सत्य
भरतच्या मृत्यूनंतर राजश्रीने सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तिने नातेवाईकांना सांगितले की, भरतचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे.
मात्र, पोलिसांना तिच्या बोलण्यावर संशय आला. त्यांनी भरतच्या मुलांशी संवाद साधला. तेव्हा १२ वर्षांच्या श्रेयाने डोळ्यांदेखत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तिने पोलिसांना तिच्या वडिलांवर झालेल्या क्रूर मारहाणीबद्दल आणि आईने त्यांना घरात कसे कोंडून ठेवले होते याबद्दल सांगितले.
आरोपी अटकेत, प्रियकर फरार
पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामागे कट रचल्याच्या आणि पतीला जाणूनबुजून मरू दिल्याबद्दल पत्नी राजश्री अहिरे आणि तिचा प्रियकर चंद्रशेखरचा भाऊ रंगा याला अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी, राजश्रीचा प्रियकर चंद्रशेखर अजूनही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेमुळे मुंबईत हळहळ व्यक्त होत आहे. एका निष्पाप मुलीसमोर पित्याचा जीव घेतल्याने आणि एका मेकअप आर्टिस्टच्या अकाली मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणातील फरार आरोपीला लवकरच अटक करून त्याला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.












Click it and Unblock the Notifications