रितू तावडेंच्या रूपाने 'मराठी चेहरा, पण गुजराती कार्ड'! एकाच दगडात दोन पक्षी मारत भाजपची मुंबईत खेळी
Mumbai BMC mayor politics : मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता हस्तगत करण्याच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या भारतीय जनता पक्षाने अखेर महापौरपदाचा आपला पत्ता उघड केला आहे. अनेक दिवसांच्या उत्कंठेनंतर, वॉर्ड क्रमांक १३२ च्या नगरसेविका रितू तावडे यांची महापौरपदासाठी निवड करून भाजपने मुंबईच्या राजकारणात एक मोठी खेळी खेळली आहे. ही निवड केवळ एका पदाची नियुक्ती नसून, आगामी राजकीय समीकरणांचा विचार करून रचलेला एक 'मास्टरस्ट्रोक' मानला जात आहे.

अटीतटीच्या शर्यतीत तावडेंची बाजी
मुंबईचे महापौरपद यंदा 'सर्वसाधारण महिला' गटासाठी राखीव झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा होती. विशेषतः तेजस्वी घोसाळकर आणि शीतल गंभीर यांची नावे आघाडीवर होती. मात्र, प्रशासकीय कामाचा अनुभव आणि पक्ष संघटनेतील मजबूत पकड यामुळे रितू तावडे यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली. शिवसेना-भाजप युतीने ११४ हा बहुमताचा आकडा पार केल्यामुळे आता तावडे यांची महापौरपदी निवड होणे ही केवळ एक औपचारिकता उरली आहे.
मराठी चेहरा अन् गुजराती व्होटबँकेचे समीकरण
भाजपने रितू तावडे यांची निवड करून अत्यंत हुशारीने मुंबईतील दोन मोठ्या समाजघटकांना साद घातली आहे.
मराठी अस्मितेला स्थान : मुंबईत 'मराठी महापौर' या मुद्द्यावरून ठाकरे गटाने भाजपला सातत्याने लक्ष्य केले होते. भाजपने सुरुवातीला 'हिंदू महापौर' अशी भूमिका घेतली असली तरी, मराठी मतांच्या ध्रुवीकरणाचा धोका ओळखून रितू तावडे यांच्या रूपाने एक मराठा चेहरा समोर आणला आहे.
गुजराती बालेकिल्ल्याचा सन्मान : रितू तावडे या घाटकोपरमधील वॉर्ड १३२ मधून निवडून आल्या आहेत. हा परिसर (विद्याविहार, गारोडिया नगर, राजावाडी) पूर्णपणे गुजराती आणि जैन बहुल आहे. या मतदारांनी एका मराठी चेहऱ्याला कौल दिला आणि भाजपने त्याच कौलाचा आदर करत त्यांना थेट मुंबईचे प्रथम नागरिकपद बहाल केले.
कोण आहेत रितू तावडे? (परिचय आणि अनुभव)
रितू तावडे या केवळ नगरसेविका नसून त्यांना महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे:
राजकीय कारकीर्द : २०१७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा घाटकोपरच्या प्रभाग १२१ मधून विजय मिळवला होता. यंदा त्यांनी १३२ मधून यश खेचून आणले.
महत्त्वाची पदे : त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवले आहे. तसेच भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि ईशान्य मुंबईच्या जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
शिक्षण व कुटुंब : १८ एप्रिल १९७३ रोजी जन्मलेल्या तावडे यांचे शिक्षण एस.वाय.बी.कॉम पर्यंत झाले असून, त्यांचे पती राजेश तावडे हे एक यशस्वी उद्योजक आहेत.
विरोधकांच्या रणनीतीला 'चेकमेट'
निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी भाजपवर 'मराठी विरोधी' असा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रितू तावडेंच्या निवडीने भाजपने हे सर्व आरोप खोडून काढले आहेत.
"मराठी माणसाला डावलले जात नाही" हा संदेश देतानाच, ज्या गुजराती मतदारांनी भाजपच्या झोळीत भरभरून मते टाकली, त्यांनाही आपण सत्तेत योग्य वाटा दिला आहे, हे भाजपने सिद्ध केले आहे.












Click it and Unblock the Notifications