14 हजार कोटींच्या 'कोस्टल रोड'ला भेगा? दुरुस्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीएमओने घेतली दखल
मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या मुंबई कोस्टल रोडला भेगा पडल्या आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या भेगा पॅच मारुन बुजविण्यात आल्या. आता या भेगावर पॅच मारण्याचा व्हिडीओ एका मुंबईकराने व्हायरल करुन बीएमसीला काही प्रश्न विचारले. आता याच व्हिडीओची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या सचिवांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने माहिती मागवली आहे.

काय होता नेमका प्रकार?
मुंबईतील कोस्टल रोडला तडे गेले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यावर घाईघाईने पॅच मारण्यात आले. हे पॅच मारल्याचा व्हिडीओ एका मुंबईकराने सोशल मीडियावर व्हायरल केला. शिवाय त्याने बीएमसीला या प्रकाराबाबत काही प्रश्न विचारले. हा व्हिडीओ मुंबईत काही सेकंदात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. निगेटिव्ह कमेंटचा पाऊस पडला.
This is beyond disappointing. Mumbai’s ₹14000 crore Coastal Road already looks like patchwork. I feel betrayed—this was supposed to be world-class infrastructure. L&T and BMC must be held accountable. Is this what we paid for? #Mumbai #CoastalRoad #InfrastructureFail pic.twitter.com/OjxZyoDrJI
— Eternal Drift (@drifteternal_) February 19, 2025
ठाकरे गटाने केला आरोप
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे बोट दाखवत, विशिष्ट कंत्राटदारांवर मेहेरबानी केल्याचा आरोप केला. शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी एक्स वर प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर जोरदार टीका केली. "हाजी अली ते वरळी पर्यंतच्या कोस्टल रोडवर केलेले पॅचवर्क हे गैरव्यवस्थापनाचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. जर आमचे सरकार सत्तेत असते तर २०२३ पर्यंत कोस्टल रोड उच्च दर्जाचे पूर्ण झाले असते. आज सायकल ट्रॅक आणि उद्याने पूर्णपणे कार्यरत झाली असती आणि लोकांसाठी खुली झाली असती," असे ते म्हणाले.
पीएमओने घेतली दखल
हाजी अलीजवळील उत्तरेकडील मार्गावर निकृष्ट दर्जाच्या पॅचवर्क दुरुस्तीचे चित्रण करणारा व्हिडिओ एक्स वर व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) देखील या समस्येची दखल घेतली. पंतप्रधान कार्यालयाच्या प्रधान सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना चिंता व्यक्त केली.
बीएमसीनेही दिले उत्तर
या सर्व प्रकणाची चर्चा होऊ लागल्यानंतर आता बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले आहे. रस्त्याच्या सांध्यावर डांबर टाकण्यात आले होते. हे डांबर रस्त्याच्या इतर भागात उडाल्याने रस्ता खडबडीत झाला होता. हा रस्ता समतल करण्यासाठी डांबराचा थर घातला. हे सर्व काम नियोजनानुसार व गुणवत्तेनुसार करण्यात आले आहे. कोस्टल रोडवर कोणत्याही प्रकारच्या भेगा पडलेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिले.












Click it and Unblock the Notifications