Mobile virus :तुमच्या मोबाइलमध्ये व्हायरस तर नाही ना? मोबाइलमध्ये एपीके फाइलद्वारे व्हायरसची एन्ट्री
Mobile virus : आजच्या डिजिटल युगात मोबाइल आणि इंटरनेटचा वापर अतिशय वाढला आहे. बँकिंगपासून ते ऑनलाइन शॉपिंगपर्यंत बहुतांश व्यवहार घरबसल्या मोबाईलवरुन करण्यास लोक प्राधान्य देत आहेत. मात्र, याचाच फायदा सायबर चोरटे घेत आहेत. मोबाईलमध्ये व्हायरस पाठवून किंवा माहिती चोरून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर हॅकर्स बेमालूमपणे बँकेच्या नावाखाली फसव्या मेसेजद्वारे एपीके फाईल (APK file) पाठवून मोबाईल हॅक करत आहेत.
सायबर चोरटे आपल्या अज्ञानाचा फायदा घेत आपले आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान करू शकतात. त्यामुळे अनोळखी स्त्रोतांकडून आलेल्या कोणत्याही मेसेजला प्रतिसाद देऊ नका. सायबर सुरक्षेच्या साधनांचा वापर करून आपण आपल्या डिजिटल आयुष्याला सुरक्षित ठेवू शकतो.

एपीके फाईल म्हणजे काय?
एपीके (APK) म्हणजे अॅड्रॉइड पॅकेज किट. हे एक फाईल फॉरमॅट आहे ज्याद्वारे अँड्रॉइड अॅप्लिकेशन इंस्टॉल करता येते. अधिकृत अॅप्लिकेशन स्टोअरमधून डाउनलोड केल्यास अशा फाईल्स सुरक्षित असतात. मात्र, अनोळखी स्त्रोतांकडून आलेल्या एपीके फाईल्स हॅकर्ससाठी एक चोर दरवाजा ठरू शकतात.
सायबर चोरट्यांचा नवा फंडा
अलीकडेच, हॅकर्सनी नामांकित बँकांची नावे वापरुन मेसेज पाठविण्याचा नवीन प्रकार सुरु केला आहे. व्हॉटस्अॅपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, युनियन बँक, आरबीएल, एसबीआय रिवॉर्ड्स किंवा पीएम किसान यांसारख्या प्रसिद्ध संस्थांची नावे वापरून मेसेज पाठवले जातात. या मेसेजमध्ये एका लिंकद्वारे एपीके फाईल डाउनलोड करण्याची सूचना असते. अनेक लोक हे मेसेज बँकेकडून आल्याचे गृहीत धरून ती लिंक ओपन करतात आणि तेथूनच फसवणुकीची सुरुवात होते.
एपीके फाईल ओपन केल्यानंतर काय होते?
जेव्हा एखादी व्यक्ती या फाईलला आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करते, तेव्हा त्यांचा मोबाईल हॅक होतो. मोबाईलमधील सर्व माहिती - कॉन्टॅक्ट्स, मेसेजेस, बँक खात्याची माहिती, फोटोज, आणि इतर वैयक्तिक डाटा हॅकर्सच्या हाती लागतो. यानंतर हॅकर्स आर्थिक व्यवहार करु शकतात, अकाऊंटमधील रक्कम चोरु शकतात, किंवा इतर फसवणूक करू शकतात.
बनावट अॅप्सपासून कसे वाचावे?
1. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मेसेजकडे दुर्लक्ष करा
बँक किंवा कोणतीही अधिकृत संस्था अनोळखी क्रमांकावरून एपीके फाईल्स पाठवत नाही. म्हणून, अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मेसेजला उत्तर देणे टाळा आणि ती लिंक ओपन करू नका.
2. अधिकृत अॅप स्टोअरचा वापर करा
अॅप्लिकेशन्स नेहमी गूगल प्ले स्टोअर किंवा अधिकृत अॅप स्टोअरमधूनच डाउनलोड करा. तिसऱ्या पक्षाच्या वेबसाइट्स किंवा अनोळखी लिंकद्वारे अॅप्स इंस्टॉल करू नका.
3. सतत अपडेटेड राहा
मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम, अॅप्स आणि सुरक्षा फिचर्सला नियमितपणे अपडेट करा. नवीन अपडेट्समध्ये अनेकदा सुरक्षेची सुधारणा केली जाते जी आपल्याला सायबर हल्ल्यांपासून वाचवू शकते.
4. सुरक्षा अॅप्सचा वापर करा
आपल्या मोबाईलमध्ये अँटीव्हायरस किंवा सुरक्षा अॅप्लिकेशन्स इंस्टॉल करणे गरजेचे आहे. हे अॅप्स संभाव्य धोक्यांना ओळखून त्यांना त्वरित ब्लॉक करू शकतात.
सायबर सुरक्षेची महत्त्वाची
आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेची अत्यंत गरज आहे. अनेक लोक आपले आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक माहिती डिजिटल पद्धतीने सांभाळतात, ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीसाठी मोठी संधी मिळते. यासाठी, प्रत्येकाने सायबर सुरक्षेबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर आलेले अनोळखी मेसेजेस किंवा लिंक्सवर क्लिक करणे टाळावे.












Click it and Unblock the Notifications