वसंत मोरे 100 गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीकडे, आज होणार ठाकरे गटात पक्षप्रवेश
मुंबई- पुण्यातील फायर ब्रँण्ड नेते वसंत मोरे आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. पुण्यातून सुमारे 100 गाड्यांचा ताफा घेत ते मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. आज दुपारी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे समजते.
दरम्यान, वसंत मोरे यांनी आपल्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा घेतल्याने मनसेला पुण्यात खिंडार पडल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वसंत मोरेंनी ठाकरेंकडून काही शब्द घेतलाय का, हे आगामी काळात समजणार आहे.

विधानसभा निवडणूका येत्या तीन-चार महिन्यात होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचित बहुजन आघाडीत जात लोकसभा निवडणूक लढविणारे वसंत मोरे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरेंचा पक्षप्रवेश होणार आहे. वसंत मोरे तब्बल 100 गाड्यांचा ताफा घेऊन पुण्याहून मातोश्रीकडे रवाना झाले आहेत.
पुणे मनसेला खिंडार
वसंत मोरेंसोबत आज मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. मी कोणालाही जबरदस्ती केलेली नाही.
कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ठाकरे गटात
ज्यांना मनसेच्या राजकारणाचा कंटाळा आलाय ते माझ्याबरोबर येत असल्याचे, वसंत मोरेंनी म्हटले आहे. वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी महापालिका, विधानसभा या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा कौल घेतला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी ठाकरे गटात प्रवेश करत आहे, असे वसंत मोरेंनी सांगितले होते.
वसंत मोरेंची नाराजी काय?
मनसेतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आपण मनसेला रामराम करत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं होतं. वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम केला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले होते.
लोकसभा निवडणुकीत पराभव
शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र, ही जागा कॉंग्रेसकडे गेल्याने येथून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. पण, त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. मात्र आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमिवर ते ठाकरे गटात प्रवेश करत आहेत.












Click it and Unblock the Notifications