ज्यांनी वेड्या-वाकड्या युत्या-आघाड्या केल्या त्यांना धडा शिकवा, राज ठाकरे स्पष्टच बोलले...
मुंबई : राज्यात आज होणाऱ्या चार प्रमुख दसरा मेळाव्यांकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आपल्या मनातील खदखद मांडली. शनिवारी सकाळी पाँडकास्टच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी, मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी निवडणुकीत मतदारांनी बेसावध राहू नये, असे आवाहन केले. महाराष्ट्र साकारण्यासाठी मला संधी द्या, म्हणत राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजवला.
काय म्हणाले राज ठाकरे
दसऱ्याच्या शुभेच्छा आपण दरवर्षी देतो. मात्र महाराष्ट्राचं सोन दरवर्षी लुटलं जातंय. आपण फक्त आपट्याची पानं एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात फक्त आपट्याची पानं राहतात. बाकीचं सोनं ते (राज्यकर्ते) लुटून चाललेत. आम्ही कधी स्वतःत मश्गूल तर कधी जाती-पातीत मश्गूल. आपण लुटारुंकडे कधी लक्ष देणार आहोत..? आजचा दसरा मेळावा हा निवडणुकीच्या तोंडावर आहे. त्यामुळे तुम्ही बेसावध राहू नका, असं म्हणत राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली.

सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा
महाराष्ट्राची प्रगती कुठं चालली आहे..? असा सवाल करत राज ठाकरे म्हणाले, नुसते रस्ते, पुल बांधून प्रगती होत नसते. प्रगती समाजाची व्हावी लागते. आपण परदेशात गेल्यावर पाहतो, त्याला प्रगती म्हणतात. आपण फक्त चाचपडतोय. एवढं असूनही आपल्याला राग येत नाही, हे विशेष. आपण दरवेळी त्याच-त्याच लोकांना निवडून देतो आणि पश्चातापाचा हात डोक्यावर मारतो. हे आता थांबवा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.
मतदारांना केले आवाहन
मतदानाचं शस्त्र तुम्ही शमीच्या झाडावर ठेवता. मतदानाच्या दिवशी ते बाहेर काढू म्हणता, मग मतदानाच्या दिवशी तुम्हाला काय होतं, म्हणत त्यांनी मतदारांना आवाहन केले. ते म्हणाले, आजपर्यंत तुम्ही ज्या लोकांना निवडून दिलं, त्यांनी तुमच्याशी प्रतारणा केली. तुम्हाला गृहीत धरलं जातंय. हे गृहित धरण्यानं महाराष्ट्राचं नुकसान होतंय. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, ज्यांनी तुमच्या मताचा अपमान केला, वेड्या-वाकड्या युत्या-आघाड्या केल्या, त्यांना धडा शिकवा. आज संध्याकाळी सगळेजण बोलतील. एकमेकांची उणी-धुणी काढतील. पण त्यांच्या बोलण्यात तुम्ही कुठे आहात...मी अनेक वर्षे महाराष्ट्र साकारण्याचं स्वप्न पाहतोय. ते साकारण्याची मला संधी द्या, असं म्हणत त्यांनी आगामी निवडणुकीचा बिगूल वाजवला.












Click it and Unblock the Notifications