बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा ताफा अडवला, सुपारीबाज चले जाओ दिल्या घोषणा
बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बीड दौऱ्यावर असताना त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर गोंधळ घातला असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा आहे. यात दोन दिवस ते बीड दौऱ्यावर आहेत.
राज ठाकरे बीड शहरात ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलच्या बाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सुपारीबाज चले जाओ अशा घोषणा देत त्यांच्या ताफ्यासमोर काही सुपा-या देखील टाकण्यात आल्या. राज ठाकरे हे सुपारी घेऊन काम करतात, त्यामुळे त्यांना जाब विचारायचा असल्याचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर आता विधानसभेला राज ठाकरे हे कोणाची सुपारी घेऊन या ठिकाणी आले आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलन शांततेत सुरू असताना याच्या विरोधात त्यांनी केलेले वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही, अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. राज ठाकरे यांच्यासमोर घोषणाबाजी करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
धाराशिवमध्येही झाला होता विरोध
राज ठाकरे यांनी आपल्या दौ-याची सुरुवात ही सोलापूर जिल्ह्यातून केली होती. मात्र, या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. त्यानंतर अनेक जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. तसेच, राज ठाकरेंविरुद्ध घोषणाबाजीही केली होती.
मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट मागितली होती. मराठा आरक्षणावर त्यांना राज ठाकरे यांच्याशी चर्चा करायची होती. पण राज ठाकरे यांनी भेट नाकराल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले. जोपर्यंत राज ठाकरे मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली होती.












Click it and Unblock the Notifications