सुरेश धसांनी थेट अजितदादांकडे केली मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील मोर्चात चौफेर टोलेबाजी
सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना कठोर शिक्षा करा, या मागणीसाठी सध्या राज्यभर मोर्चे सुरु आहेत. बीड, बुलढाणा, परभणीनंतर आज पुण्यात सर्वपक्षिय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कालच त्यांनी आका हा दुसरा तिसरा कुणी नसून, वाल्मिक कराडच आहे, असं सांगत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे आजच्या मोर्चात आ. धस काय बोलणार याकडे लक्ष लागले होते.

वाल्मिक कराडवर निशाणा
आपल्या भाषणात आ. धस यांनी वाल्मिक कराडवर निशाणा साधला. ते म्हणाले, सगळे आरोपी पुण्यातच सापडलेत. गँग्ज ऑफ परळीने पुण्याचे नाव खराब केलेय. वालूबाबाची (वाल्मिक कराड) पुण्यात किती पाँपर्टी आहे, हे आम्हाला कळवा. याच वालूबाबाने बीडमध्ये संघटीत गुन्हेगारी सुरु केलीय. त्याला त्याच्या आकाचा आशीर्वाद आहे. आता हा आका आणि आकाचा आका या सर्वांनाच फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
आपल्या भाषणात आ. सुरेश धस यांनी अजित पवारांना विनंती केली. ते म्हणाले, अजित पवार हा मनाचा प्रांजळ माणूस आहे. अजित पवार हे कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाहीत. पण अजितदादा धनंजय मुंडेकडे तुमचे काय अडकलेय, तेच समजत नाही. धनंजय मुंडेंचा राजीनामा अजित पवार का घेत नाही, तेच समजत नाही. जोपर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पुर्ण होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवू नये. त्यांना सरकारच्या बाहेर ठेवावे, असा पुनरुच्चार आ. धस यांनी बोलून दाखवला.
पुण्यातील आमदारांना टोला
पुण्यातील मोर्चात तेथील स्थानिक आमदार गैरहजर होते. याबाबत सुरेश धस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, रविवारी पुण्यातील आमदारांना सुटी असते. सुटी असल्याने त्यांना पुण्यातील मोर्चात येण्यास वेळ मिळाला नसेल, असा टोलाही आ. धस यांनी लगावला. दरम्यान, आ. धस यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूर्यवंशी यांना दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. संतोष देशमुख यांच्या बाबतीत ज्या मागण्या आम्ही केल्या त्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या आहेत. या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी काम पाहावे, अशी विनंती मी केली आहे.












Click it and Unblock the Notifications