लाडकी बहिण योजना! तटकरे म्हणाल्या, बातम्या चुकीच्या; जरांगे पाटील म्हणाले, फक्त निवडणुकीपुरतं...
लाडकी बहिण योजनेचा जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. महिलांच्या खात्यावर जानेवारीचा हप्ता धरुन आत्तापर्यंत १० हजार ५०० रुपये आले आहेत. मात्र सरकारने आता या योजनेच्या अर्जाची तपासणी सुरु केल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आता याच बातम्यांबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठे भाष्य केले. त्यानंतर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनीही या बातम्यांनंतर सरकारचे कान टोचले.

नेमक्या काय आहेत चर्चा?
लाडकी बहिण योजनेचा जानेवारीचा हप्ता, शुक्रवारपासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. निवडणूक काळात या योजनेने महायुती सरकारला दुसऱ्यांदा सत्तेत आणले. मात्र आता निवडून आल्यानंतर सरकारने या योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरु केल्याच्या बातम्या सुरु झाल्या आहेत. एका वृत्तपत्राने तर, ३० लाख लाभार्थी महिलांना पैसे परत करायला सांगितल्याचे वृत्तही आले आहे. सरकारने खरंच, अर्जांची छाननी सुरु केली आहे का, याबाबत लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
काय म्हणाल्या तटकरे?
या बातम्यांसंदर्भात आता मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर दिले. आज रायगड येथे ध्वजावंदनानिमित्त आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, सरकारने फक्त नियमबाह्य लाभार्थ्यांना आवाहन केले होते. त्यानंतर काही महिलांनी स्वतःहून या योजनेतून माघार घेतली. मात्र ती संख्या काही हजारांत आहे. एका बातमीत मात्र लाखांत संख्या सांगितली आहे. ती चूकीची आहे. आम्ही कोणत्याही अर्जाची तक्रारीशिवाय चौकशी केलेली नाही. या सगळ्या अफवा आहेत. या बातम्यांवर कुणीही विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
जरांगे पाटलांचीही उडी
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवलीत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांनी लाडक्या बहिण योजनेबाबत सरकारला कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, बहिणींच्या मायेत सरकार दुरावा आणत आहे. लाभार्थ्यांत भेदभाव आणि कंजूषी कशासाठी? असा सवाल करत जरांगे पाटील सरकारला म्हणाले, टिळा लागेपर्यंत तुम्हाला सगळ्या बहिणी लागत होत्या. निवडून येताना सगळ्यांना पैसे द्यावे असे वाटत होते. आता पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली आहे. लाडक्या बहिणीत सरकार जसे उघडे पडले, तसे आरक्षणातही सरकार उघडे पाडणार आहे, असा दावा त्यांनी केला.












Click it and Unblock the Notifications