गुड न्यूज! म्हाडा मुंबई लाॅटरीतील फ्लॅटच्या किंमती केल्या कमी! गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा
MHADA Lottery Mumbai : म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज करणाऱ्यासाठी मोठी बातमी आहे. आता म्हाडाने आपल्या फ्लॅटच्या किमतीत पंधरा ते पंचवीस टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. त्यामुळे आता घर घेणे हे आवाक्यात येणार आहे.
म्हाडा गरजूंना आणि होतकरुंना घर देण्यासाठी बांधिलकी ठेवते. हेच धोरण म्हाडाने ठेवत अनेकांच्या डोक्यावर छत दिले आहे. म्हाडाच्या सदनिकांचे दर जास्त झाल्याचे अलिकडे बोलले जात होते. या धर्तीवर मुंबईतील किमतीही सामान्यांच्या आवाक्यात नाही असंही बोललं जात होते त्यामुळे म्हाडाने आता हा निर्णय घेतला आहे.

म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली 33 (5) व 33 (7) व 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या 370 सदनिकांच्या विक्री किंमती सुमारे 10 ते 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज दिली.
मुंबई मंडळ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 19 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सावे यांनी सांगितले.
नवीन व मागील सोडतीतील या सदनिका पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून म्हाडाला गृहसाठा म्हणून प्राप्त या सदनिका असून अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 25 टक्क्यांनी, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 20 टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 15 टक्क्यांनी, उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे सावे यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये म्हाडाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी जनसंवाद प्रामुख्याने सुलभ व पारदर्शक राहावा, या उद्देशाने म्हाडातर्फे निर्माण करण्यात आलेल्या शुभंकर चिन्हाचे (Mascot)अनावरण गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज म्हाडा मुख्यालयात करण्यात आले. यावेळी श्री. सावे बोलत होते.












Click it and Unblock the Notifications