MHADA Lottery: म्हाडाचे घर घेण्याची सुवर्णसंधी सोडू नका, अर्ज करण्याची मुदतवाढ, जाणून घ्या प्रक्रिया
MHADA Lottery 2025 : 'म्हाडा'च्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबई, ठाणे आणि पालघरमधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण मंडळातर्फे ठाणे, वसई आणि सिंधुदुर्गमधील ५,२८५ सदनिका आणि ७७ भूखंडांसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आता इच्छुकांना अर्ज सादर करण्यासाठी १२ सप्टेंबर २०२५ पर्यंतची मुदत मिळाली आहे.

नवीन वेळापत्रक आणि महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची अंतिम मुदत: 12 सप्टेंबर 2025 (रात्री ११:५९ पर्यंत)
- ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत: 13 सप्टेंबर 2015 (रात्री 11:59 पर्यंत)
- RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत: 15 सप्टेंबर २०२५ (रात्री 11:59 पर्यंत)
- अर्जांची तात्पुरती यादी प्रसिद्ध: २२ सप्टेंबर २०२५ (संध्याकाळी 6:00 वाजता)
- अंतिम यादी प्रसिद्ध : 07 ऑक्टोबर 2025 (संध्याकाळी 6:00 वाजता)
- लॉटरी काढण्याची तारीख : 09 ऑक्टोबर 2025
- विजेत्यांची यादी प्रसिद्ध : 09 ऑक्टोबर 2025
योजनेतील घरांची संख्या
या लॉटरीमध्ये एकूण 5,285 सदनिका आणि 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ही सोडत पाच वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागली आहे. ती खालीलप्रमाणे आहे.
- 20 टक्के सर्वसमावेशक योजना : 565 सदनिका
- 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना: 3,002 सदनिका
- म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (विखुरलेल्या सदनिका): 1,677 सदनिका.
- म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (50 टक्के परवडणाऱ्या सदनिका): 41 सदनिका.
- याव्यतिरिक्त, ७७ भूखंडांसाठीही अर्ज करता येणार आहे.
आत्तापर्यंतची आकडेवारी
28 ऑगस्ट 2025 पर्यंत या लॉटरीसाठी 1 लाख 49 हजार 948 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 1 लाख 16 हजार 583 अर्जांनी अनामत रक्कम भरली आहे.
ही वाढलेली मुदत अर्जदारांना त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची आणि योग्य अर्ज भरण्याची संधी देईल, अशी आशा आहे.
अर्जदारांना कोणत्याही अडचणी आल्यास, 022-69468100 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल. म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वरूनच अर्ज करण्याचे आवाहन कोकण मंडळाने केले आहे.
ही मुदतवाढ मिळाल्यामुळे, ज्यांना अजून अर्ज करता आला नाही, त्यांना आता 'म्हाडा'चे घर घेण्याची आणखी एक सुवर्णसंधी मिळाली आहे.












Click it and Unblock the Notifications