MHADA : अबब! 6 हजार 248 फ्लॅटच्या किंमती एक ते दीड लाखांनी उतरल्या! म्हाडाचे घर तुमच्या आवाक्यात
MHADA Konkan 6,248 flats price reduced : म्हाडाचे घर मिळावे म्हणून अनेकजण चातकासारखी वाट पाहत असतात, अशांसाठी आता एक मोठी खूशखबर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने दिली आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्रीला उपलब्ध असलेल्या ठाणे इथं कल्याणमधल्या मौजे शिरढोण आणि मौजे खोणी इथल्या ०६ हजार २४८ सदनिकांची विक्री किंमत कमी करण्यात आली आहे.
म्हणजेच आता म्हाडाचे हे दोन गृहप्रकल्प पहिल्यापेक्षाही स्वस्त झाले आहेत. कोकण मंडळातील कल्याणमधील खोणी आणि मौजे शिरढोण येथील म्हाडाच्या तब्बल ६ हजार २४८ घरांसाठी म्हाडा मंडळाने ही मोठी घोषणा आज केली आहे.

किती स्वस्त झाले कल्याणच्या खोणी आणि मौजे शिरढोण येथील प्रकल्प
म्हाडाच्या कल्याण भागातील खोणी आणि मौजे शिरढोण येथील गृहप्रकल्पाच्या किंमती तब्बल १ लाख ४३ हजार रुपयांनी कमी केल्या आहेत. आता म्हाडाचे घर तुमच्या आवाक्यात असू शकते, त्यामुळे म्हाडानेही या प्रकल्पासाठी ग्राहकांना संधी असल्याचे म्हटले आहे.
अत्यल्प उत्पन्न गटातील किती फ्लॅटच्या किमती घटवल्या?
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मौजे शिरढोण इथल्या सदनिकांच्या सुधारित विक्री किंमत प्रस्तावास मान्यता दिली असून सदर मान्यतेनुसार कोकण मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मधील प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या योजनेतील ठाणे जिल्ह्यातल्या मौजे शिरढोण इथल्या अत्यल्प उत्पन्न गटातील ५ हजार २३६ सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका ०१ लाख ४३ हजार ४०४ रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
आता किती झाल्या मौजे शिरढोण आणि खोणी येथील घरांच्या किमती?
मौजे शिरढोण आणि खोणी येथील एका सदनिकेची सुधारित विक्री किंमत आता १९ लाख २८ हजार ७४२ रुपये आकारण्यात येणार आहे. तसंच मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मधील प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील मौजे खोणी इथं अत्यल्प उत्पन्न गटातील १ हजार ०१२ सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका ०१ लाख ०१ हजार ८०० रुपयांनी कमी करण्यात आली असून सदर सदनिकेची सुधारित विक्री किंमत आता १९ लाख ११ हजार ७०० रुपये असणार आहे.
संधीचा लाभ घ्या - म्हाडाकडून आवाहन
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातल्या सदनिकांसाठी हक्काचं घर घेऊ इच्छिणाऱ्या आणि नागरिकांनी कमी झालेल्या दराचा लाभ घ्यावा, असं आवाहन मंडळाने केले आहे.












Click it and Unblock the Notifications