नवीन व्यावसायिक वाहन खरेदी करताय? गुढी पाडव्यापासून सरकारने घेतलाय 'हा' महत्त्वाचा निर्णय; वाचा...
मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी महायुती सरकारकडून वेगवेगळे मार्ग अवलंबिले जात आहे. केंद्राने काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर महाराष्ट्रातील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मराठी विषयाची सक्ती करण्यात आली. आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महायुती सरकारने पुन्हा एक निर्णय घेतला आहे.

काय घेतलाय निर्णय?
गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होते. या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यवसायिक वाहनांवर लिहिलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. मराठी भाषेचे संवर्धन करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री ससनाईक यांनी सांगितले.
काय म्हणाले सरनाईक?
या निर्णयाबाबत माहिती देताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर लिहिलेले सामाजिक संदेश, जाहिराती किंवा प्रबोधनात्मक माहिती ही हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये असते. उदाहरणार्थ बेटी बचाव बेटी पढाव... हे हिंदीत असते. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारवर बंधने येतात. परंतु यापुढे असे सामाजिक संदेश मराठी भाषेत लिहिले जातील. ट्रक, ट्रॅक्टर किंवा इतर व्यावसायिक वाहने खरेदी केलेल्या वाहनांवर हे संदेश बंधनकारक राहतील, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
परिवहन आयुक्तांना दिले निर्देश
येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश तसेच इतर महत्वाच्या जाहीराती व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहीण्याची अंमलबजावणी सुरु करावी. तसे निर्देश परिवहन आयुक्त यांना दिल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे, मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यास गती मिळेल आणि माय मराठीचा आपलेपणा अधिक प्रभावी होईल, असे त्यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications