मनसे नेत्याच्या मुलाचा धिंगाणा! दारूच्या नशेत मराठी इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, धमकीचा व्हिडीओ व्हायरल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ करताना आणि धमकावताना दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. अंधेरीतील या प्रकरणात अभिनेत्री राखी सावंतची मैत्रीण आणि ओळख मिळवलेली इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे हिने संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अपघातानंतर रस्त्यावर गोंधळ, अर्धनग्न अवस्थेत शिवीगाळ
ही घटना रविवारी रात्री घडली. राजश्री मोरेच्या गाडीला एका कारने जोरदार धडक दिली. त्या कारमध्ये राहिल शेख हा युवक होता, जो मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा असल्याचं सांगण्यात आलं आहे. राजश्रीच्या म्हणण्यानुसार, राहिल हा दारूच्या नशेत गाडी चालवत होता. अपघातानंतर तो अर्धनग्न अवस्थेत तिच्याशी आक्रमकपणे बोलत होता, शिवीगाळ करत होता आणि धमकावत होता.
"मी जावेद शेखचा मुलगा आहे... पोलिसांना सांगून काही होणार नाही"
राजश्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राहिल शेख तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करताना दिसतो. त्यात तो म्हणतो, "XXX पैसे घे... पोलिसांकडे जा... मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग बघ, काय होतं ते." या घटनेनंतर राजश्रीने ओशिवरा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. तिने एफआयआरची कॉपीही सार्वजनिक केली आहे.
पोलिसांशीही गैरवर्तन, सहकार्यास नकार
या प्रकरणातील व्हिडीओमध्ये राहिल शेख घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांशीही अरेरावी करताना दिसतो. तो पोलिसांच्या सूचना धुडकावतो, त्यांच्याशी उच्चरवात बोलतो आणि सहकार्य नाकारतो.
एफआयआरनंतर मिळताहेत धमक्या?
राजश्री मोरेने आरोप केला की, एफआयआर दाखल झाल्यानंतर तिला सतत धमक्या येत आहेत. त्या धमक्या मनसे कार्यकर्त्यांकडून मिळत असल्याचं तिचं म्हणणं आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर आणखी व्हिडीओ शेअर करत आपली बाजू मांडली आहे.
पूर्वीही आली होती वादात
यापूर्वीही राजश्री मोरे एका व्हिडीओमुळे वादात आली होती. मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर मनसेच्या भूमिकेवर टीका करत तिने म्हटलं होतं की, "भाषा लादण्यापेक्षा स्थानिकांनी मेहनत केली पाहिजे." तसेच स्थलांतरितांमुळे मुंबईतील मराठी जनतेला संधी मिळत असल्याचा मुद्दा तिने मांडला होता. यामुळे वर्सोवा येथील मनसे कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणानंतर राजश्रीने माफी मागून व्हिडीओ हटवला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. राजकीय दबावाचा आरोप आणि महिलेशी गैरवर्तन झाल्याचा दावा यामुळे ही घटना गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications