मोठी बातमी! मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक खालावली, डॉक्टरांकडून तपासणी सुरू
Mumbai: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची ईसीजी तपासणी झाली असून ह्रदयासंबंधित इतर तपासण्या आधुनिक मशीनद्वारे करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मनोज जरांगे यांना काल (शुक्रवार,२२ जून) रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. यानंतर ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. मात्र अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पुन्हा त्यांची प्रकृती खालावली असून डॉक्टरांकडून आवश्यक त्या तपासण्या सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

सततच्या प्रवासामुळे प्रकृतीवर परिणाम
मनोज जरांगे यांनी शुक्रवारी बीड जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्या कमरेचं दुखणं वाढलं होतं. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मनोज जरांगे यांना प्रवासामुळे त्रास झाला असून घाबरून जाण्याचं काही कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती पुढे आलेली आहे. दरम्यान, अजून काही तपासण्या झाल्या नंतर डॉक्टरांकडून सविस्तर माहिती दिली जाणार असल्याच सांगितलं जात आहे.
छगन भुजबळांवर जोरदार प्रहार
दरम्यान, जालन्यातील वडीगोद्री येथे सुरु असलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळाला आज सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात छगन भुजबळ यांच्यासह सरकारमधील इतर काही मंत्री सहभागी होते. सरकारच्या आश्वासनानंतर हाके यांनी आपल्या उपोषणाला स्थगिती दिली. यानंतर हाके आणि भुजबळ यांनी जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.
जरांगे यांनी देखील यास प्रत्युत्तर दिलं. मराठे शांत आहेत तर शांत राहूद्या अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी भुजबळ यांना इशारा दिला. तसेच धनगर बांधवांनी भुजबळांच्या नादी लागू नये असही ते म्हणाले. धनगर आणि मराठा समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न भुजबळांकडून सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी यावेळी केला.












Click it and Unblock the Notifications