जरांगेंनी फडणवीसांना दिला मोठा शब्द, शिवनेरी किल्ल्यावरून मनोज जरांगे म्हणाले...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून, अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या या मोर्चाने शिवनेरी किल्ल्यावर धडक दिली आहे. शिवनेरीच्या ऐतिहासिक भूमीवरून बोलताना जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान देत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, "शिवनेरी आणि रायगड यांसारख्या किल्ल्यांवरून आम्हाला प्रेरणा मिळते. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या वेदना समजून घ्यायला हव्यात. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. आम्ही मुंबईला जाणारच आहोत."
जरांगे पाटलांनी सरकारवर टीका करताना, आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी देणे ही मराठा समाजाची चेष्टा असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, "न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही परवानगी मागितली, पण एक दिवसाची परवानगी देऊन तुम्ही आमची खिल्ली उडवली आहे. जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत परवानगी का दिली जात नाही?"
'तुम्ही आमचे वैरी नाही, फक्त मराठाविरोधी भूमिका सोडा'
शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी बोलताना जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना एक संधी असल्याचे सांगितले. "तुम्ही आमचे शत्रू नाही, फक्त मराठाविरोधी भूमिका सोडून द्या. तुम्ही जर मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी केली, तर मराठा समाज तुमचे उपकार कधीच विसरणार नाही," असा 'शब्द' त्यांनी दिला.
मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या:
मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेत आपल्या मुख्य मागण्यांचा पुनरुच्चार केला:
- कुणबी नोंदींची अंमलबजावणी: मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे कुणबी नोंदींची तातडीने अंमलबजावणी करावी. जोपर्यंत ही अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही.
- हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करा: हैदराबाद गॅझेटियरचा अभ्यास 13 महिन्यांपासून सुरू आहे. त्याऐवजी हैदराबाद आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करा.
- 'सगेसोयरे'ची व्याख्या: 'सगेसोयरे' अध्यादेश दीड वर्षांपूर्वी आला, पण त्याची व्याख्या अजून स्पष्ट नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत, त्यांच्या नातेवाईकांनाही 'सगेसोयरे' म्हणून आरक्षण द्या.
- गुन्हे मागे घ्या: आंदोलनादरम्यान मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घ्या.
- कायद्यात बसणारं आरक्षण द्या: मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण तातडीने द्या.












Click it and Unblock the Notifications