२५ तारखेपर्यंत थांबा, तुमच्या मागेच लागतो; मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंना इशारा
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभर आक्रोश मोर्चे सुरु आहेत. आज पैठण येथील आक्रोश मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर थेट आरोप केले. माझ्याविरोधात आंदोलन करणारी मुंडेंची लाभार्थी टीम आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. धनंजय मुंडे हे पाप करण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतात, आपली पापं झाकण्यासाठी ते ओबीसींच्या मागे लपतात, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

काय म्हणाले जरांगे?
आपल्या भाषणात जरांगे पाटील म्हणाले, "संतोष देशमुखांच्या भावाला धमक्या दिल्यानंतर आपण त्या गुंडांच्या विरोधात बोललो. तर आपल्यावरच केसेस दाखल करण्याचं षडयंत्र केलं जातंय. धनंजय मुंडे यांच्या लाभार्थी बगलबच्च्यांचं हे काम आहे. तुमच्या लाभार्थी टोळींना आंदोलनं करायला लावता, आरोपीच्या मागे उभे राहता. हे चुकीचं नाही का? उद्या तुमच्या घरातील कुणी मेले तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का? जर आरोपीला साथ द्यायचं असं झालं तर राज्यात इतर ठिकाणीही असेच प्रकार घडतील."
धनंजय मुंडेंवर आरोप
जरांगे म्हणाले, स्वतःचे पाप झाकण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींचा आसरा घेत आहेत. खून करणार तुम्ही, पाप करणार तुम्ही, आणि ओबीसींच्या मागे लपायचं. धनंजय मुंडेंनी पीक विमा खाणाऱ्या, राख खाणाऱ्या टोळ्या आणल्यात. या नासक्या पाच पन्नास लोकांनी त्यांच्या जातीची बदनामी झाली आहे. माझं आंदोलन कोणत्याही जातीविरोधात नाही.
संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात एक हजार केसेस दाखल झाल्या, तरी मागे हटणार नाही. धनंजय मुंडे, आपण कुणाला घाबरत नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
माझ्याविरोधात प्रयोग सुरु
जरांगे म्हणाले, धनंजय मुंडेंनी जे प्रयोग सुरू केलेत, षडयंत्र आखलेत, त्यामुळे त्यांचे पाय अजून खोलात जातील. लोकांना सांगितलं जातंय की रास्ता रोखो करा, आंदोलन करा. पण यामुळे ते जास्त खोलात जात आहेत हे त्यांना समजत नाही. धनंजय मुंडे हे त्यांच्या गुंडांच्या टोळीच्या जीवावर उभे आहेत. पण जोपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. २५ तारखेपर्यंत थांबा मग धनंजय मुंडेंच्या मागे हात धुवून लागतो, असा इशाराही जरांगे यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications