माणिकराव कोकाटेंचे मंत्रीपद निश्चित जाणार; कोकाटेंना दादांवर विश्वास पण राजीनाम्यावरुन NCPत मतभेद?
Manikrao Kokate Latest News : विधिमंडळात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या राजीनाम्याची चर्चा फेटाळून लावली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून, आपल्या समर्थकांना शक्तीप्रदर्शन करण्याची कोणतीही गरज नसल्याचेही सांगितले आहे.
त्यामुळे सिन्नर येथील त्यांचा नियोजित मेळावा रद्द करण्यात आला आहे. मात्र, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या राजीनाम्यावरून दोन गट पडले असून, अजित पवार लवकरच यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे दिसत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राज्य विधिमंडळात ऑनलाइन रमी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.
त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे संकेत दिल्याने कोकाटे यांचा राजीनामा निश्चित मानला जात होता. याच पार्श्वभूमीवर, कोकाटे यांच्या समर्थकांनी सिन्नर येथे मेळावा आयोजित करून शक्तीप्रदर्शन करण्याचा मानस केला होता.
'अजित पवारांवर माझा पूर्ण विश्वास' - कोकाटे
माणिकराव कोकाटे यांनी मात्र आपल्या समर्थकांना शक्तीप्रदर्शन करण्याची काहीच गरज नसल्याचे सांगत समजूत काढली. "माझा अजित पवार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. विशेषतः माझ्या खात्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार नाही. राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे खाते म्हणून माझ्या विभागाचे काम चालते. त्यामुळे मेळावा घेऊ नका," असे स्पष्ट निर्देश त्यांनी आपल्या समर्थकांना दिले. त्यानंतर, समर्थकांनी सिन्नर येथील आजचा नियोजित मेळावा रद्द केला. कोकाटे यांच्या या भूमिकेने कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला असला तरी, त्यांनी पक्षनेतृत्वावर विश्वास दर्शविल्याचे स्पष्ट झाले आहे.
शनिदेवाचे दर्शन आणि राजकीय चर्चा
दुसरीकडे, माणिकराव कोकाटे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी देशातील एकमेव साडेसातीमुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमंडळ येथील शनिमंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. त्यांच्या या शनिदर्शनाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावर अजित पवार मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे, अशा परिस्थितीत कोकाटेंनी शनिदेवापुढे लीन होणे हे विशेष मानले जात आहे. संकटात सापडल्यानंतर देवाचे दर्शन घेणे ही भारतीय संस्कृतीची एक बाजू असली तरी, राजकीय दृष्ट्या याला वेगळे अर्थ लावले जात आहेत.
कोकाटेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीत मतभेद?
कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. काही नेत्यांच्या मते, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचे खाते बदलून त्यांना वादग्रस्त वक्तव्ये आणि व्हिडिओप्रकरणी शिक्षा दिली जाईल.
यापूर्वी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता कोकाटे यांचाही राजीनामा घेतला, तर पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसेल, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. तर काहीजणांना वाटते की, कोकाटे यांचा राजीनामा घेतला तर रोहित पवार आणि अन्य विरोधकांच्या दबावाला आपण बळी पडलो, असा संदेश जाईल. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या मुद्द्यावर एकमत होताना दिसत नाही.
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा निश्चित?
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात शुक्रवारी रात्री पुण्यात दोन तास चर्चा झाली. या चर्चेत माणिकराव कोकाटे यांचे सभागृहातील कृत्य आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना 'शासन भिकारी" असल्याचे केलेले विधान या दोन मुख्य मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते.
या दोन्ही प्रकरणांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोकाटे सातत्याने सरकारला अडचणीत आणणारी विधाने करत असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असा सूर या बैठकीत उमटल्याचे समजते. यामुळे अजित पवार मंगळवार सायंकाळपर्यंत कोकाटेंच्या मुद्द्यावर आपला अंतिम निर्णय पक्षातील इतर नेत्यांना कळवतील अशी शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications