माणिकराव कोकाटेंसाठी आजचा दिवस ठरणार अतिशय महत्त्वाचा, आमदारकी जाणार?
सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर सिन्नरचे आमदार आणि राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी गुरुवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, सध्या त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंत्रिपदाचा राजीनामा आणि खांदेपालट
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावर कोकाटे यांनी गुरुवारी रात्री आपला राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीनंतर राज्यपालांनी हा राजीनामा तात्काळ मंजूर केला आहे. कोकाटे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांचा अतिरिक्त कार्यभार आता अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण १९९५ सालातील आहे. अल्प उत्पन्न गटासाठी (EWS) असलेल्या शासकीय कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि शपथपत्रे सादर केल्याचा ठपका कोकाटे यांच्यावर होता. नाशिक सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत त्यांना दोन वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची टांगती तलवार आता कायम आहे.
अटकेचे वॉरंट आणि लिलावतीत दाखल
न्यायालयाने कोकाटे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक मुंबईत पोहोचले आहे. मात्र, वॉरंट निघाल्यानंतर कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांची अँजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे. पोलीस सध्या रुग्णालयात असून डिस्चार्ज मिळताच त्यांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.
आजची सुनावणी ठरणार महत्त्वाची
सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळावी आणि जामीन मंजूर व्हावा, यासाठी आज (शुक्रवार, १९ डिसेंबर) उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालय त्यांना दिलासा देणार की पोलिसांच्या कारवाईचा मार्ग मोकळा होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications