कृषीमंत्रिपद गेल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "I AM VERY HAPPY..."
विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रमी खेळताना दिसल्याने वादात सापडलेले आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून अखेर कृषीमंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता दत्तात्रय भरणे यांची नवे कृषीमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोकाटेंना भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. या खातेबदलावर कोकाटे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

कोकाटे म्हणाले, "मी आनंदी आहे"
कृषीमंत्रिपदावरून हटवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा निर्णय आपल्याला मान्य असल्याचे सांगितले. तसेच, "दत्तात्रय भरणे यांना काही मदत लागल्यास मी नक्की करेन आणि मला त्यांची मदत लागल्यास ती घेईन," असेही ते म्हणाले. नवीन मिळालेले खाते आवडले का, असे विचारले असता त्यांनी "I AM VERY HAPPY..." अशी प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांनी साधला दुहेरी डाव
या खातेबदलाकडे राजकीय वर्तुळात अजित पवारांनी 'एका दगडात दोन पक्षी मारल्या'च्या दृष्टीने पाहिले जात आहे. खातेवाटपानंतर क्रीडा आणि युवक कल्याण खाते मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा असलेल्या दत्तात्रय भरणे यांना कृषीसारखे महत्त्वाचे खाते देऊन अजित पवारांनी त्यांची नाराजी दूर केली आहे. तर दुसरीकडे, रमी प्रकरणावरून कोकाटेंवर कारवाई केल्याचेही दाखवून दिले आहे. यामुळे, भरणे यांच्यासाठी हा खातेबदल एकप्रकारे 'लॉटरी' ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.












Click it and Unblock the Notifications