अमृता फडणवीसांना मॅडम नव्हे 'माँ अमृता' म्हणून संबोधणार; मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अजब विधान
Amrita Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सातत्याने चर्चेत असतात. कधी नवीन गाणं रिलीज करणं असो की अजब विधान करणं असो. परंतु, आज भाजपचे मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यापुढे आता अमृता मॅडम नव्हे अमृता मॉ असे मी त्यांना संबोधणार आहे, असे विधान त्यांनी केले.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, अमृता फडणवीसांनी आता माँचे रुप घेतले आहे. मुलां-मुलींसाठी त्या जे काम करत आहेत, त्यासाठी मी आजपासून त्यांना अमृता मॅडम नाही, माँ अमृता असं संबोधणार आहे. दिव्याज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा अमृता फडणवीस यांना मी विनंती करतो की समुद्रावरील कचरा साफ करता हे अत्यंत चांगले काम करता. आता राजकारणातील कचराही स्वच्छ करावा.

अमृता फडणवीसांकडून स्वच्छता मोहीम
गणेश विसर्जनानंतर दरवर्षी अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनच्या वतीने समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली जाते. सकाळी 6.30 वाजता वर्सोवा किनारपट्टी स्वच्छ करण्याच्या मोहीमेला सुरुवात झाली. अमृता फडणवीसांच्या या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आणि अभिनेता आयुष्मान खुराणा उपस्थित होते.
कोणतेही सेक्टर असो, स्वच्छता पाहिजेच
अमृता फडणवीस म्हणाल्या की, प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला स्वच्छता पाहिजे कॉर्पोरेट असो किंवा पॉलिटिक्स असो सर्वत्र स्वच्छता असली पाहिजे. राजकारण असो किंवा आपली मनं असो, कोणतेही सेक्टर असो कोणत्याही सेक्टरमध्ये काही ना काही घाण असते. त्यामुळे स्वच्छता करण्याची गरज आहे, म्हणून आपण म्हणतो योगा करा मेडिटेशन करा.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, आपल्याकडे नद्या, तलाव, समुद्र हे असलेले पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवले पाहिजेत. आपण त्यांची काळजी घेऊ तेव्हाच हे स्वच्छ राहतील. समुद्र आणि तलावात प्लॅस्टिक टाकून मोठे प्रॉब्लेम होतात. शहराचा आर्थिक विकास करायचा असेल तर आधी स्वच्छता राखली पाहिजे. आपण जसं आपलं घर सुंदर ठेवतो, तसाच आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आपण देवभक्त आहोत, देवाला स्वच्छता आणि सुंदरता आवडते.












Click it and Unblock the Notifications