लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; रक्षाबंधनापूर्वी मिळाला दिलासा
महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने ही रक्कम लवकर वितरित केली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यासाठी पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत.

योजनेची रक्कम आणि लाभार्थी
या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. जुलै महिन्यासाठी २ हजार ९८४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. आतापर्यंत १२ हप्त्यांची रक्कम जमा झाली असून, आता १३वा हप्ता जमा होत आहे. सरकारकडून या योजनेसाठी एकूण २८ हजार २९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
२६ लाख महिलांची गृहचौकशी सुरू
या योजनेच्या नियमांनुसार एका कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच लाभ मिळतो. मात्र, काही ठिकाणी दोनपेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, अशा सुमारे २६ लाख महिलांची गृहचौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीत ज्या कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे, त्यापैकी अतिरिक्त महिलांना मिळणारा लाभ बंद केला जाईल. या चौकशीनंतर काही महिला योजनेतून वगळल्या जाण्याची शक्यता आहे.
काही महिलांना मिळतात ५०० रुपये
योजनेच्या नियमांनुसार, ज्या महिलांना केंद्र सरकारची 'पीएम किसान सन्मान निधी योजना' आणि राज्य सरकारची 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' या दोन्ही योजनांचा लाभ मिळतो, त्यांना 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत दरमहा ५०० रुपये दिले जातात.












Click it and Unblock the Notifications