Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रायगडमध्ये 'रक्तरंजित' खेळ; काळोखेंच्या हत्येचा प्लॅन तटकरेंच्या घरात ठरला?,शिंदेंच्या आमदाराचा आरोप

Raigad Mangesh Kalokhe murder : "रायगडचे आका सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरून जिल्ह्यात रक्तरंजित राजकारण सुरू असून, विरोधकांच्या हत्यांचे कट त्यांच्याच उपस्थितीत शिजत आहेत," असा खळबळजनक आरोप शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे.

खोपोलीतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येनंतर रायगडमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, आता हे युद्ध थेट महायुतीमधील दोन पक्षांत जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

Raigad Mangesh Kalokhe murder

काय आहे नेमकं प्रकरण?

खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून काहीच दिवस उलटले असताना, २६ डिसेंबर रोजी नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भरचौकात हत्या करण्यात आली. या घटनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या हत्येमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि त्यांच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

"सुतारवाडीत शिजला हत्येचा प्लॅन" - महेंद्र थोरवे

आमदार महेंद्र थोरवे यांनी या हत्येचे धागेदोरे थेट सुनील तटकरे यांच्या घरापर्यंत जोडले आहेत. थोरवे म्हणाले की, मुख्य आरोपी रवींद्र देवकर याने हत्येच्या ४-५ दिवस आधी सुतारवाडी येथे जाऊन सुनील तटकरेंची भेट घेतली होती. या भेटीतच मंगेश काळोखे यांना संपवण्याचा कट रचण्यात आला. सुनील तटकरे हे जिल्ह्याचे 'आका' असून त्यांच्याच मर्जीने हे सुडाचे राजकारण सुरू आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा शब्द: "आरोपींना ठेचून काढू"

घटनेचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपोलीत जाऊन काळोखे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी काळोखे कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा आणि 'मोका' लावण्याची मागणी केली. "मी काळोखे परिवाराच्या मागे ठामपणे उभा आहे. ज्यांना जनतेने निवडून दिलं, त्यांच्यावर सूड उगवला जात आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मी स्वतः लक्ष ठेवून आहे. कुणालाही सोडणार नाही, आरोपींना ठेचून काढू," असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

पोलीस कारवाई आणि तपासाचे अपडेट्स

जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ८ पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर यांना नागोठणे परिसरातून पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून अटक केली आहे. सुधाकर घारे याच्यासह १० जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

निलंबनाची मागणी

या प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

सुनील तटकरेंचे स्पष्टीकरण

या गंभीर आरोपांनंतर सुनील तटकरे यांनी आपली बाजू मांडली आहे. "घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि निर्दयी आहे. मात्र, अशा प्रकरणावर राजकारण करणे योग्य नाही. पोलिसांनी सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+