मोठी बातमी : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा 85-85-85 फॉर्म्युला; संजय राऊत- नाना पटोलेंची घोषणा
MVA Seat Sharing Formula : शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर करण्याचे आदेश दिले. मविआचं जागावाटप सुरळीतपणे पार पडलं आहे, असं राऊत यांनी सांगितलं. तर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा 85-85-85 फॉर्म्युला; संजय राऊत- नाना पटोलेंनी घोषणा केली आहे.
महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी खासदार संजय राऊत, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, अनिल देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली.

संजय राऊत म्हणाले की, 85-85-85 असं एकूण 270 जागांवर यादी बनवलेली आहे. उरलेल्या जागांवर मित्रपक्षांसोबत चर्चा सुरु होईल. या प्रकारे 288 जागा मविआ पूर्ण ताकदीनं लढेल,असं संजय राऊत म्हणाले. यात समाजवादी पार्टी, शेकाप यांना सामावून घेतले जाईल.
मविआ म्हणून ही निवडणूक लढत आहोत - नाना पटोले
नाना पटोले म्हणाले की, सर्व राजकीय पक्षांची बैठक शरद पवार यांच्यासमोर झाली. 85-85-85 या जागांवर मिळून एकूण 270 जागांवर एकमत झालं आहे. उर्वरित 18 जागांवर शेकाप, कम्युनिस्ट, समाजवादी पक्षांसोबत चर्चा सुरु आहेत. उद्या या जागांवर आमच्यामध्ये स्पष्टता येईल. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्रात मविआचं सरकार येईल, असा विश्वास आम्हाला आहे.
शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मविआच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपासंदर्भातील घोषणा केली आहे. मविआ 18 जागा कुणाला देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्या यादीत 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र तिन्ही पक्षांकडून काही नावांची घोषणा करण्यात आली असली तरी त्यामध्ये बदल होतील, असेही राऊत म्हणाले.
मित्रपक्षांना 18 जागा देण्यात येणार?
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, मविआच्या तीन पक्षांकडून पहिल्या टप्प्यात 85-85-85 जागा घेण्यात आल्या असल्या तरी ज्या जागांवरुन वाद होत्या त्या मागं ठेवण्यात आल्या आहेत. मविआकडून मित्रपक्षांना 18 जागा सोडल्या जातील असं सांगण्यात आलं. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर, ज्या जागांवरुन वाद होता त्या भायखळा आणि वर्सोवा या जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा सेनेकडून करण्यात आलेली नाही.












Click it and Unblock the Notifications