Maharashtra Weather Update : राज्यात कसे असणार वातावरण कुठे असेल सर्वाधिक थंडी, वाचा सविस्तर
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सद्या हुडहुडी भरलेली आहे.
आयएमडीच्या अहवालानुसार, राज्यात अनेक भागात किमान तापमान 10 अंशांच्या खाली पोहोचले. उत्तर महाराष्ट्रात तर तापमान 4-5 अंशावर पोहोचले होते. मुंबईकरांना 9 वर्षांनंतर सर्वात कमी तापमानाची नोंद झाल्यानं थंडीची अनुभूती घेता आलेली आहे. एकीकडे राज्यात अशी परिस्थिती असताना आता हवामान विभागाने आणखी एक इशारा दिला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने दिलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहणार असून हवामान कोरडेच राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या 4 ते 5 दिवसात थंडीचा कडाका काहीसा कमी होऊन किमान तापमानात हळूहळू 2-3 अंशांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानं उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीच्या लाटेचा इशारा दिलाय. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये 11 ते 13 डिसेंबरपर्यंत हाडं गोठवणारी थंडी राहणार आहे. उत्तराखंडमध्ये तर जमीन गोठणार असल्याचं सांगण्यात आलंय. पण त्याचवेळी दक्षीणेकडे पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा विकसित होत असून केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेशात तुफान पावसाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहणार असून हवामान कोरडेच राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान येत्या दोन दिवसात एक ते दोन अंशांनी वाढण्याचा अंदाज भारतीय प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलाय.
देशाच्या राजधानीत कसं असणार हवामान?
दिल्लीत आज आणि उद्या कडाक्याच्या थंडीचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पारा बऱ्यापैकी खाली येऊ शकतो. यासोबतच 12 आणि 13 डिसेंबरला दाट धुक्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सकाळी आणि संध्याकाळी दाट धुक्यामुळे लोकांना दिसण्यात अडचण येऊ शकते. हवामान खात्यानुसार, आजचा दिवस या मोसमातील सर्वात थंड दिवस असू शकतो. दिल्लीत किमान तापमान ४ अंशांवर जाऊ शकते.
संपूर्ण एनसीआरमध्ये आजचा दिवस या हिवाळ्यातला सर्वात थंड दिवस असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने 12 आणि 13 डिसेंबरला थंडीच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. येत्या काही दिवसांत धूर कमी होऊन थंडीचा प्रभाव वाढणार आहे. दिवसभर थंडीमुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वाऱ्याचा वेग ताशी 10-12 किलोमीटर असू शकतो.












Click it and Unblock the Notifications