Maharashtra Weather :महाराष्ट्रात आज उद्या पाऊस कोसळणार, 25 मेपर्यंत कुठे कुठे बरसणार सरी जाणून घ्या
Maharashtra Weather : राज्यात सर्वदूर पावसाचेच वातावरण असून काल बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. आज आणि उद्याही राज्यात काही ठिकाणी हलक्या तेमध्यम पावसाची शक्यता आहे तसेच या काळात तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटासह सरी कोसळतील अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कोकण घाट परिसरात अधिक पावसाची शक्यता असून येत्या २५ मे पर्यंत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात नागरिकांनी सतर्कता बाळगावी असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात कुठे कसे हवामान अन् पावसाची स्थिती
कोकण
आजपासून २४ मे पर्यंत पावसाची शक्यता कोकणात आहे. उद्या पर्यंत तुरळक आणि त्यानंतर बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रात २४ मे पर्यंत पावसाची शक्यता आहे. या काळात तुरळक िकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पावसादरम्यान विजांचा कडकडाट आणि वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
मराठवाडा
मराठवाड्यात आज तुरळक तर उद्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या दरम्यान विजांचा कडकडाट आणि वारे वाहणार आहे तर २४ मे पर्यंत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील.
विदर्भ
विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी तर २४ मे पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. २३ आणि २४ मे रोजी मेघगर्जनेचा अंदाज नाही.
पुणे हवामान
पुण्यात आज अंशतः ढगाळ वातावरण असून दुपारी आणि संध्याकाळीही हेच वातावरण राहू शकते. आज मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसंच ताशी तीस ते चाळीस किमी वादळी वारे वाहणार असून या दरम्यान पावसाची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान
- मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
- मराठवाड्यात काही ठिकाणी व विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली.
- मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
- उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
२४ तासांतील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) ३२.२, सांताक्रूझ ३३.४, अलिबाग ३५.६, रत्नागिरी ३३.५, पणजी (गोवा) ३३.५, डहाणू ३५.९, पुणे ३४.५, लोहगाव ३७.६, अहिल्यानगर ३३.८, जळगाव ३९.२, कोल्हापूर ३३.८. महाबळेश्वर २५.४, मालेगाव ३५.०, नाशिक ३३.४, सांगली ३४.३. सातारा ३३.७, सोलापूर ३६.६, धाराशिव ३५.१, छत्रपती संभाजीनगर ३५.८, परभणी ३७.८, नांदेड बीड अकोला ४०.०, अमरावती ३९.२. बुलढाणा ३९.६, ब्रह्मपुरी ४०.२. चंद्रपूर ४०.०. गोंदिया ३९.६, नागपूर ४१.२, वाशिम ३७.२. वर्धा ३७.६, यवतमाळ ३७.४.
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान नागपूर येथे ४१.२ अंश सेल्सियस नोंदवले गेले.












Click it and Unblock the Notifications