महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीतील 9 महत्त्वाचे निर्णय; 'लाडकी बहीण' सह कृषी विभागासंदर्भात निर्णय
Maharashtra Cabinet Decisions : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज गुरुवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. तर विभागानिहाय विविध विषयावर चर्चा देखील करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
प्रामुख्याने आजच्या बैठकीत मराठवाड्यात असलेल्या ओला दुष्काळसदृश्य परिस्थितीबाबत चर्चा झाली. परंतु या बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही मोठी घोषणा होते का? याकडे राज्याचं लक्ष होतं. पण तसल्या प्रकारचा कोणताही निर्णय या बैठकीत झाल्याचे पाहायला मिळाले नाही. दुसरीकडे या बैठकीत पाऊस, शेती या विषयी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. आजच्या बैठकीत झालेल्या निर्णयाविषयी घ्या जाणून.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय :
सार्वजनिक बांधकाम : पुणे- छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार
पशुसंवर्धन विभाग : अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार
वस्त्रोद्योग विभाग : शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य
कृषी विभाग : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान
महिला व बालविकास : अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. 36 हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार
कामगार विभाग : औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
पशुसंवर्धन विभाग : थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ.
जलसंपदा विभाग : धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार
विधी व न्याय विभाग : काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय, पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय, हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा करणार
मंत्रिमंडळ बैठकीत इतर चर्चा काय?
मदत व पुनर्वसन : लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे.
कृषी विभाग : राज्यात 121 टक्के पेरण्या
जलसंपदा विभाग : राज्यातील मोठी धरणे 2018 नंतर प्रथमच शंभर टक्के भरली
महिला व बालकल्याण : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: सुमारे 1 कोटी 60 लाख भगिनींना 4787 कोटींचे वाटप.
निधी वळवल्याचे वृत्त सरकारने फेटाळले
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आलेला निधी हा इतर योजनांचा निधी इकडे वळवण्यात आल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्यात येणारा निधी या योजनेत सरकारने वळवल्याचेही वृत्त होते. मात्र, सरकारने हे वृत्त फेटाळले असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतही यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर, स्वयंस्पष्ट आदेश काढण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील कोट्यवधी महिलांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना दरमहा मिळणारे 1500 रुपये लाभास सध्यातरी कुठलीही अडचण नसल्याचे दिसून येते.












Click it and Unblock the Notifications