Maharasht Rain : विदर्भात पावसाचा हाहाकार! आमदारांच्या बंगल्यात शिरलं पाणी, जनसन्मान यात्रा रद्द
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाने जोरदार पुनरागमन केलं असून विदर्भात पावसाने हाहाकार झाला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. यवतमाळ शहर आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. परिणामी पुसद शहरात आयोजित केलेली राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र रेन अपडेट्स
बीड - बिंदुसरा नदीकाठच्या परिसरात दक्षतेचा इशारा
बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. या प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे परिणामी बिंदुसरा नदी पात्रामध्ये पाणी मोठ्या गतीने वाहू लागलेले आहे. त्यामुळे बीड शहरांमधून जाणाऱ्या बिंदुसरा नदीकाठच्या दुतर्फा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी केले आहे. त्याचबरोबर पालिकेच्या स्वच्छता विभागासह अन्य विभागांना देखील नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत.

वाशिम
24 तासांत अतिमुसळधार पाऊस पडणार
वाशिम जिल्ह्यात पुढील चोवीस तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत भारतीय हवामान व विज्ञान केंद्र ,नागपूर यांच्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आहे. सर्व संबधित यंत्रणांनी सजग राहावे.जिल्ह्यातील रहीवासी तसेच नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं प्रशासनानं सांगितलंय.तसंच जिल्ह्यात धरणाचे गेट उघडल्यास तात्काळ नदी काठावरील गावांना सतर्कता बाळगावी हेही सांगण्यात आलं आहे.
यवतमाळ
पुसदमध्ये पावसाचा हाहाकार
यवतमाळच्या पुसद मध्ये पावसाच्या पाण्याने हाहाकार उडाला आहे. रात्रीपासून पावसाचा जोर कायम असून अनेक भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला परिणामी अर्धे पुसद जलमय झाले आहे. पूस नदी सह परिसरातील सर्व नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहे, परिणामी पुसद शहरात सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. बाहेरचे पाणी अनेक घरांमध्ये शिरले असून घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे तर वीज पुरवठा देखील खंडित झाल्याने नागरिकांचे हाल होत आहे.
आमदार नाईकांच्या बंगल्यात शिरले पाणी
पावसाचा फटका आमदार इंद्रनील नाईक यांच्या बंगल्याला देखील बसला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या पुसद मधील या बंगल्यात पाण्याचे लोट आले असून हॉल मध्ये पाणी साचले आहे. अशीच परिस्थिती पुसद मध्ये अनेक भागात झाली असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.
पुसदमधील जनसन्मान यात्रा रद्द
यवतमाळच्या पुसद मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज नियोजित जनसन्मान यात्रा रद्द झाली आहे. पुसद उपविभागात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले असून सभास्थळी देखील पाणी साचले आहे. अनेक गाव व शेतीत देखील पाणी आहे. त्यामुळे अजित पवारांची जनसन्मान यात्रा रद्द करण्यात
सोलापूर जिल्ह्यात यलो अलर्ट
सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याच पाहायला मिळत आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे राज्यात येत्या 72 तासांत बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल.
3 ते 5 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातही पावासाची शक्यता असून घाटमाथ्यावर देखील पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, साधारणत: 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी रात्री पासून च पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रविवार रात्रीच्या सुमारास जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Maharashtra Rain)












Click it and Unblock the Notifications