कोकणात मुसळधार तर विदर्भात पेरण्या रखडल्या, हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?
बंगालच्या उपसागर आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर सध्या कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. हे हवामान तंत्र पश्चिम-उत्तर दिशेने सरकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण, घाटमाथा आणि काही भागांत जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने रायगड, पुणे आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे.

कोकणात मुसळधार, घाटमाथ्यावरही पावसाचा जोर
राज्यात काही भागांत पावसाचा जोर सध्या थोडा ओसरलेला असला तरी कोकण आणि घाटमाथ्यावर मात्र पावसाच्या सरी सुरू आहेत. सोमवारी कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे शहर आणि आसपासच्या भागात गेल्या दोन दिवसांत ढगाळ हवामान आणि अधूनमधून ऊन पाहायला मिळत आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगांची दाटी दिसून आली.
विदर्भात पेरण्या रखडल्या, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
विदर्भातील अनेक भागांत अजूनही समाधानकारक पावसाची वाट पाहिली जात आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, किमान 100 मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. परंतु काही शेतकऱ्यांनी हलकासा पाऊस पडताच शेतीचा हंगाम सुरू केल्याने आता ते समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. नागपूर जिल्ह्यात एकूण 4.69 लाख हेक्टर पेरणी क्षेत्रांपैकी केवळ सुमारे 57 हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.
मराठवाड्यात मान्सूनची ओढ
मे महिन्यात सुरुवातीच्या चांगल्या पावसानंतर जून महिन्यात मान्सूनने विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात जूनमध्ये अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नाही. धाराशिव जिल्ह्यात मेमध्येच पावसाची हजेरी लागली होती, मात्र जूनमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. गेल्या 12-15 दिवसांपासून या जिल्ह्यात पावसाचा थेंबही नाही.
पुढचा अंदाज काय?
हवामान विभागाने सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनानेही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.












Click it and Unblock the Notifications