कुंभमेळ्यात का गेले नाहीत ते त्यांना विचारा ना... एकनाथ शिंदे यांनी पुन्हा साधला ठाकरेंवर निशाणा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे कुंभमेळ्याला जाऊनही त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान केले नाही. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हेही कुंभमेळ्याला गेले नाहीत. यावर राजकारणात बरीच चर्चा सुरु आहे. सत्ताधाऱ्यांनी या दोन्ही नेत्यांवर हिंदू नसल्याबाबतचे आरोप केले आहेत. आता ठाकरे गटाच्या नेत्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निशाणा साधला आहे. कुठं गेलं त्यांचे हिदूत्व, असा प्रश्न मीडियाने त्यांना विचारावा, अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी उद्धव ठाकरे हे कुंभमेळ्याला न गेल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, हे लोक स्वतःला हिंदू म्हणवतात. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू है, असं म्हटलं होतं. मात्र आता त्यांच्या (उद्धव ठाकरे) उक्ती व कृतीत फरक आहे. महाकुंभात जगभरातील ६५ कोटींहून अधिक लोकांना स्नान केलं. मात्र स्वतःला हिंदू रक्षक समजणारे महाकुंभाला गेले नाहीत. पत्रकारांनीच त्यांना याबाबत विचारायला हवं, असं एकनाथ शिंदे यांना स्पष्ट केलं.
काँग्रेसकडून गांधी परीवाराची पाठराखण
राहुल गांधी व सोनिया गांधी यांनी संगमान स्नान न केल्याबाबत उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, मी स्वतः कुंभमेळ्यात गेलो होते. तेथे स्नान करुन दर्शनही घेतलं. मी तेथे काँग्रेस कुटुंबाच्या वतीने गेलो होतो. गांधी कुटुंबाच्यावतीने गेलो होतो. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून गेलो होतो. मी तेथे देशाच्या कल्याणासाठी गांधी परिवाराच्यावतीने प्रार्थना केली. हा एक उत्सव आहे. त्यात राजकारण करु नये.
स्वारगेट प्रकरणावरही बोलले
पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वागगेट प्रकरणावर प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ही घटना निंदणीय आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी.यासाठी सरकार प्रयत्न करेल. पुण्यातील घटनेच्या तपासावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघे स्वत: लक्ष ठेऊन आहेत. मी देखील पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो आहे, आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications