Maharashtra police Bharti :15 हजार पदांची मेगाभरती, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया अन् कशी कराल तयारी
Maharashtra police Bharti 2025 Latest News in Marathi : महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे.
आज मंगळवारी दि.१२ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे १५ हजार पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई अशा विविध पदांचा समावेश आहे. ही भरती केवळ राज्याची कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठीच नव्हे, तर अनेक तरुणांच्या स्वप्नांना पंख देणारी आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा असणार!
या भरती प्रक्रियेमध्ये एकूण पाच प्रकारची पदे भरली जाणार आहेत. पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:
- पोलीस शिपाई: १०,९०८ पदे
- सशस्त्र पोलीस शिपाई: २,३९३ पदे
- कारागृह शिपाई: ५५४ पदे
- पोलीस शिपाई (चालक): २३४ पदे
- बॅण्ड्स मॅन: २५ पदे
ही पदे २०२४ आणि २०२५ या वर्षांमध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन भरली जात आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारीला लागणे आवश्यक आहे.
भरती प्रक्रियेचे स्वरूप नेमके कसे असेल?
ही भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावर राबविण्यात येते. यासाठी उमेदवारांना खालील टप्प्यांतून जावे लागणार आहे.
अर्ज आणि छाननी :
सर्वप्रथम, उमेदवारांना अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. यानंतर, अर्जांची छाननी केली जाईल.
शारीरिक चाचणी:
पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी (Physical Test) घेतली जाईल. यामध्ये धावणे, लांब उडी, गोळाफेक इत्यादी चाचण्यांचा समावेश असतो. या टप्प्यात पात्र ठरणारे उमेदवारच पुढील टप्प्यासाठी निवडले जातात.
लेखी परीक्षा:
शारीरिक चाचणीत यशस्वी झालेल्या उमेदवारांची OMR आधारित लेखी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा गट क संवर्गातील पदांसाठी असते. यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या विषयांवरील प्रश्न विचारले जातात.
अंतिम निवड:
लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीतील गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड यादी तयार केली जाते.
वयोमर्यादेत सूट
या भरतीचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्या उमेदवारांनी सन २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडली आहे, त्यांनाही या भरतीमध्ये अर्ज करण्याची एक विशेष संधी दिली गेली आहे. त्यामुळे, असे उमेदवारही या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
तयारी कशी करावी?
- इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच दोन्ही टप्प्यांची तयारी सुरू करणे महत्त्वाचे आहे.
- शारीरिक तयारी: दररोज नियमितपणे धावण्याचा सराव करा, पुश-अप्स, पुल-अप्स आणि इतर शारीरिक व्यायाम करून आपली तंदुरुस्ती वाढवा.
- लेखी परीक्षेची तयारी: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरणावर लक्ष केंद्रित करा. वेळ व्यवस्थापनाचा सराव करण्यासाठी नियमितपणे मॉक टेस्ट सोडवा.
मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने आता लवकरच या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पोलिस विभागात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक उमेदवारांसाठी ही मोठी संधी असणार आहे. त्याचा फायदा तर त्यांना घ्यावाच लागणार आणि जोरदार तयारी करावी लागणार एवढं मात्र सत्य आहे.












Click it and Unblock the Notifications