Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जेजुरीत विजयाचा जल्लोष जीवावर बेतला: मिरवणुकीत आगीचा भडका, नवनिर्वाचित नगरसेवकांसह 16 जण जखमी

Jejuri Fire Incident During Victory Rally : 'येळकोट येळकोट घेई खंडेराया'च्या जयघोषात आणि सोन्यासारख्या भंडाऱ्याच्या उधळणीत न्हाऊन निघणाऱ्या जेजुरीत आज एका भीषण दुर्घटनेने खळबळ उडाली आहे. जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर जल्लोष साजरा करत असताना अचानक आगीचा भडका उडाला. या दुर्दैवी घटनेत नवनिर्वाचित नगरसेवकांसह एकूण १६ जण भाजले असून, विजयाच्या आनंदाला गालबोट लागले आहे.

Jejuri Fire Incident During Victory Rally

विजयाचा उन्माद आणि आगीचा थरार!

राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. जेजुरी नगरपरिषदेवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत सत्तांतर घडवून आणले. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गडाच्या पायथ्याशी गुलालाऐवजी खंडेरायाचा प्रिय 'भंडारा' उधळण्यास सुरुवात केली.

जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीजवळ नवनिर्वाचित उमेदवार आणि कार्यकर्ते खंडेरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी जमले होते. एका बाजूला फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला मोठ्या उत्साहात भंडाऱ्याची उधळण केली जात होती. याच दरम्यान, हवेत उधळलेल्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला आणि आगीचा मोठा लोळ उठला. या आगीच्या विळख्यात तिथे उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित नगरसेवक सापडले.

१६ जण भाजले, नगरसेवकांचाही समावेश!

या दुर्घटनेत एकूण १६ जण होरपळले आहेत. यामध्ये काही नवनिर्वाचित नगरसेवकांचाही समावेश असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर परिसरात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. जखमींना तात्काळ जेजुरीतील स्थानिक सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

'भेसळयुक्त भंडारा' कारणीभूत?

जेजुरीत भंडाऱ्याला आगीचा भडका लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्राथमिक अंदाजानुसार, बाजारपेठेत मिळणाऱ्या भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. शुद्ध हळदीचा वापर करण्याऐवजी त्यात रासायनिक घटक मिसळले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. फटाक्यांमधून निघालेली ठिणगी हवेतील या रासायनिक भंडाऱ्याच्या संपर्कात आल्यानेच हा भीषण भडका उडाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जेजुरीत 'दादां'ची सरशी, जगतापांना धक्का!

निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास, जेजुरीत मोठे राजकीय सत्तांतर पाहायला मिळाले आहे. माजी आमदार संजय जगताप यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने १७ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली.

राष्ट्रवादीचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नगराध्यक्षपदावर नाव कोरले. भाजपला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला.

संजय जगताप यांची सत्ता खालसा करून जयदीप बारभाई यांच्या रूपाने अजित पवारांनी खेळलेली खेळी यशस्वी ठरली असली, तरी विजयाच्या या पहिल्याच दिवशी घडलेल्या अग्नितांडवाने जेजुरीकर हळहळ व्यक्त करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+