स्थानिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले! ठाकरे गटासह अजित गटाकडून प्रत्येकी 40 स्टार प्रचारकांची घोषणा
Nagarparishad Nagarpanchayat Election 2025 :आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) गटाकडून प्रत्येकी 40 स्टार प्रचारकांची (Star Campaigners) यादी जाहीर करण्यात आली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रण तापण्यास सुरुवात झाली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून 'या' ४० जणांची तोफ धडाडणार
ठाकरेंच्या शिवसेनेने 40 स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. या यादीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह तरुण आणि प्रभावी वक्त्यांचा समावेश आहे.
प्रमुख नेते
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, राजन विचारे.
इतर महत्त्वाचे प्रचारक
आमदार अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, अंबादास दानवे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, आमदार वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, खासदार प्रियांका चतुर्वेदी, ओमराजे निंबाळकर, संजय (बंडू) जाधव, आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, वैभव नाईक यांचाही यात समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या स्टार प्रचारकांची यादी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (NCP Ajit Pawar) कडूनही आगामी निवडणुकांसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, अदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे. प्रभावी चेहऱ्यांमध्ये नवाब मलिक, सयाजी शिंदे, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर, इंद्रनील नाईक, समीर भुजबळ, अनिकेत तटकरे यांसारख्या दिग्गजांचाही या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
2 डिसेंबरला मतदान; अर्ज भरण्यास दोनच दिवस शिल्लक!
राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे:
मतदान: २ डिसेंबर २०२५
मतमोजणी: ३ डिसेंबर २०२५
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. आज (रविवार) सुट्टीच्या दिवशीही सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १७ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे, इच्छूक उमेदवार आजपासून अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी करण्याची शक्यता आहे. उमेदवारांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.












Click it and Unblock the Notifications