मनपा, जि.प. निवडणुकापूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; या जिल्हाध्यक्षांनी सोडली साथ!
Eknath Shinde Shivsena News : राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, आता शिवसेना शिंदे गटाला मोठा राजकीय हादरा बसल्याची बातमी समोर आली आहे. महायुतीच्या घटकपक्षांमध्येच पक्षांतरण सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अजित पवार गटात
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रमुख नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिंदे गटाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला आहे. जमादार यांच्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हे दोन्ही महत्त्वाचे पक्षप्रवेश पार पडले. हा प्रवेश शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान जिल्हाध्यक्षाने पक्ष सोडणे हे संघटनेसाठी हानिकारक ठरू शकते.
महायुती अजूनही अस्पष्टता
एकीकडे भाजपच्या नेत्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील, असे संकेत दिले जात आहेत. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी स्वबळाचे संकेत दिले होते, तर आता महायुतीमधील घटकपक्षाचे नेते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत असल्याने महायुतीच्या एकजुटीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मविआमध्ये अजून बैठकाच झालेल्या नाहीत
याचबरोबर, महाविकास आघाडीचे चित्रही अजून स्पष्ट झालेले नाही. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची युती होणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीतील या पक्षांतरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, सर्वच पक्षांना आता आपली पुढील रणनीती ठरवावी लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications