मराठवाड्यात 'ऑपरेशन टायगर' मोहीम; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा एल्गार!
Marathwada Local Boday Election 2025, Eknath Shinde Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने ताकद वाढवण्याचा आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मराठवाड्यात एक विशेष रणनीती आखली आहे, ज्याला राजकीय वर्तुळात 'ऑपरेशन टायगर' असे म्हटले जात आहे.
'ग्राऊंड कनेक्ट' आणि कार्यकर्त्यांशी संवाद
एकनाथ शिंदे हे अजूनही स्वतःला सामान्य शिवसैनिक मानतात. ते कितीही मोठ्या पदावर असले तरी कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क असतो. मुंबई आणि ठाण्यानंतर शिंदे यांचे सर्वाधिक लक्ष मराठवाड्यातील शिवसैनिकांवर केंद्रित झाले आहे.
ते वारंवार छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करतात. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून ते संघटना वाढवण्यासाठी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात. हा 'कार्यकर्त्यांशी कनेक्ट' आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसाठी जमेची बाजू ठरू शकतो.

मराठवाड्यात शिवसेनेची रणनीती
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत शिवसेनेने लक्ष केंद्रीत केलेले आहे, त्यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाड्याची राजधानी ही छत्रपती संभाजीनगर आहे, आणि येथील महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे.
यासाठी जुन्या शिवसैनिकांची मोट बांधण्याचे काम सुरू आहे. नुकताच शहरात एक मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला, ज्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. या सोहळ्यात सातपेक्षा जास्त माजी महापौरांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला.
📍छत्रपती संभाजीनगर
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 9, 2025
◆ शिवसेनेच्या जाहीर सभा व पक्ष मेळाव्यातील काही खास क्षण 🏹🚩 pic.twitter.com/xNgq1ap7mM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या खांद्यावर आहे. शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली शिरसाट यांनी गेल्या काही महिन्यांत अनेक महत्त्वाच्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले आहे.
यात माजी महापौर त्र्यंबक तुपे, नंदकुमार घोडेले, विकास जैन, गजानन बारवाल, किशनचंद तनवाणी, कला ओझा यांचा समावेश आहे. यामुळे ठाण्यानंतर एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली ताकद वाढवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विभागनिहाय विस्ताराचे प्रयत्न
केवळ छत्रपती संभाजीनगरच नाही, तर जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांची जबाबदारी देखील मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे आहे. त्यांचा या भागात सातत्याने दौरा होत असून ठाकरे गट आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्याचे काम केले जात आहे.
सध्या मराठवाड्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे एक खासदार आणि १३ आमदार असे संख्याबळ आहे. या ताकदीच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना एक निर्णायक भूमिका बजावेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासोबत महायुतीत ही निवडणूक लढवली जाणार असली, तरी मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठे यश मिळू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
या सर्व घडामोडी पाहता, मराठवाड्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आगामी निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थाने 'गेमचेंजर' ठरू शकते. त्यांचे कार्यकर्त्यांशी असलेले थेट संबंध आणि मराठवाड्यातील स्थानिक नेत्यांना जोडण्याची रणनीती यामुळे भविष्यात पक्षाला चांगला फायदा होण्याची चिन्हे दिसत आहेत.












Click it and Unblock the Notifications