सावधान! महाराष्ट्राचा पारा चढला; पुढील 48 तास उष्णतेचा 'हाय अलर्ट', जाणून घ्या IMDचा अंदाज काय?
Maharashtra Heatwave Alert : राज्यावर सध्या सूर्याची वक्रदृष्टी पडल्याचे चित्र दिसत असून, उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. मार्च महिना अर्धाही सरला नसताना राज्याचा पारा आता चाळीशीकडे वाटचाल करू लागला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असून अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

विदर्भात तापमानाचा उच्चांक: अमरावती ४० पार!
विदर्भात उन्हाचा तडाखा सर्वाधिक जाणवत आहे. आज राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती जिल्ह्यात ४०.८°C इतकी झाली आहे.
हवामान खात्याने विदर्भातील तीन प्रमुख जिल्ह्यांना - अकोला, अमरावती आणि वर्धा - पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट दिला आहे. या ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा ५ अंशांनी जास्त राहण्याची शक्यता असून पारा ४० अंशांच्या वर स्थिरावणार आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही तापमान ३८ ते ४० अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
कोकण आणि मुंबईत 'दमट' उन्हाचा त्रास
केवळ विदर्भच नव्हे, तर किनारपट्टीच्या भागातही स्थिती चिंताजनक आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना उष्ण व आर्द्र (Hot and Humid) हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. ८ आणि ९ मार्च रोजी या भागात घामाच्या धारा वाढतील आणि आर्द्रतेमुळे उकाडा अधिक असह्य होईल. कोकण किनारपट्टीवर पुढील काही दिवस सातत्याने तापमान वाढीचे संकेत आहेत.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात उकाड्याने लाही-लाही
पुणेकरांनाही आता उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. पुण्यात सरासरीपेक्षा २ अंशांनी तापमान वाढले असून सध्या ३६ ते ३७ अंशांची नोंद होत आहे. केवळ पुणेच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातील इतर शहरांची स्थितीही खालीलप्रमाणे आहे:
- सांगली: ३७.४°C
- नाशिक: ३६.६°C
- सातारा: ३६.१°C
मराठवाड्याचा पाराही चढला
मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परभणीत सर्वाधिक ३८.५°C तापमानाची नोंद झाली असून, छत्रपती संभाजीनगर (३७.६°C), बीड (३६.६°C) आणि धाराशिवमध्येही पारा ३६ अंशांच्या पुढे गेला आहे. या महिन्याच्या अखेरीस राज्याच्या बहुतांश भागात तापमान ४० अंशांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञांची मते आहे.












Click it and Unblock the Notifications