Maharashtra Election Dates:महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा! एका टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान
Maharashtra Election 2024 Dates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरु झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुकींची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणुका होत आहेत. तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. या घोषणेसह महाराष्ट्रात आचारसंहीताही आजपासून लागू झाली आहे.
यासंदर्भात राजधानी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु आहे. या पत्रकार परिषदेत आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी निवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने याआधी दौरा करुन आढावा घेतला होता. तसेच सर्व राजकीय पक्षांशी चर्चाही केली होती. त्यानंतर आयोगानेही आपल्या वतीने सर्व तयारी पूर्ण केली आहे. आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, 85 वर्षांवरील नागरिकांनात घरी मतदानाची सोय करुन देण्यात येणार आहे. सर्व प्रक्रियेचे छायाचित्रण होणार आहे.

मतदान कार्यक्रम एका टप्प्यात (288 विधानसभा मतदारसंघ)
- महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक 2024
- राजपत्र अधिसूचना जारी करण्याची तारीख 22.10.2024 (मंगळवार)
- नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 29.10.2024 (मंगळवार)
- नामांकन छाननीची तारीख 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)
- उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 (सोमवार)
- मतदानाची तारीख 20 नोव्हेंबर 2024 (बुधवार)
- मतमोजणीची तारीख 23.11.2024 (शनिवार)

महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ असून या सर्व मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेची मुदत येत्या 26 नोव्हेंबरला संपणार आहेत. त्याअनुशंगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात 9 कोटी 59 लाख मतदार
महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहीता लागू झाली तर दुसरीकडे निवडणुकीसाठी राजकीय पक्षांन जय्यत तयारी केली आहे. सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीने आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी यंदा 9 कोटी 59 लाख इतके मतदार आहेत.
4 कोटी 59 लाख पुरुष तर 4 कोटी 64 लाख महिला मतदार
महाराष्ट्रातील 9 कोटी 59 लाख मतदारांमध्ये 4 कोटी 59 लाख पुरुष मतदार आहेत, तर 4 कोटी 64 लाख महिला मतदार आहेत. तृतीयपंथी मतदार 56 हजारांवर असून दिव्यांग मतदार 6 लाख 32 हजार इतके आहेत. 85 वर्षांवरील मतदार 12 लाख 48 हजार असून शंभरी ओलांडलेले मतदार 49 हजारांहून अधिक आहेत.तर नवमतदार 19 लाख 48 हजार इतके आहेत.
2019 निवडणुकीत किती कुणाला जागा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या. मात्र 145 ची मॅजिक फिगर एकहाती गाठण्यात भाजपला अपयश आलं होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या स्थानावर , तर तेव्हांच्या राष्ट्रवादीनेही कांटे की टक्कर देत 54 जागा जिंकल्या. तर काँग्रेसने 44 जागा जिंकल्या.
काय बदलली समीकरणं
आता मात्र हे समीकरण बदलले असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार आता राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत. उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळल्यानंतर पुन्हा आता राज्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे.












Click it and Unblock the Notifications