महाराष्ट्र निवडणूक 2024- एक्झिट पोल म्हणजे काय? एक्झिट पोलचे निकाल केव्हा, आणि कुठे पहावेत?
Maharashtra Assembly Election 2024- महाराष्ट्रात आज म्हणजेच 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान सुरु झाले आहे. आज संपूर्ण राज्यात एका टप्प्यात मतदान सुरू झाले आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या मतदानासोबतच सर्वांच्या नजरा एक्झिट पोलकडेही असणार आहेत. या एक्झिट पोलवरून महाराष्ट्रात महायुतीचे सरकार कायम राहणार, की महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. काही मतदारसंघात अपक्षांनीही चांगलीच रंगत आणली आहे. त्या अपक्षांची काय स्थिती आहे, हेही या एक्झिट पोलवरून समजणार आहे.

किती वाजता येतात एक्झिट पोल?
एक्झिट पोल कधी जाहिर करावेत, यासाठी निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. त्यानुसार सायंकाळी सहानंतर किंवा उशीराही मतदान संपल्यानंतरच एक्झिट पोल जाहीर केले जाऊ शकतात. मतदान करण्यापूर्वी एक्झिट पोलच्या अंदाजाने मतदार प्रभावित होणार नाही, म्हणून हा नियम करण्यात आला आहे. म्हणूनच मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर केले जातात.
संध्याकाळी 6 वाजेनंतर एक्झिट पोल जाहीर होतील, पण लक्षात ठेवा की एक्झिट पोलमध्ये विजय-पराजय आणि जागांचा अंदाज केवळ मतदान केंद्रावरील मतदारांशी संभाषणातून केला जातो. तो अधिकृत निकाल नसतो. एक्झिट पोल हे फक्त निवडणुकीत कोणत्या पक्षाची कामगिरी कशी आहे याचे प्राथमिक संकेत देतात. खरा निकाल हा 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच समजणार आहे.
महाराष्ट्र एक्झिट पोलचे निकाल कुठे पहावेत
२० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर सर्व वृत्तवाहिन्या एक्झिट पोल दाखवण्यास सुरुवात करतील. वन इंडिया, NDTV, इंडिया टुडे, टाइम्स नाऊ आणि रिपब्लिक टीव्ही यासारख्या प्रमुख राष्ट्रीय वृत्तवाहिन्या त्यांचे स्वतंत्र एक्झिट पोल निकाल जाहीर करतील. याशिवाय, Axis My India, C Voter, Matrice आणि People's Pulse सारख्या प्रमुख मतदान संस्थाही अंदाज जनतेसमोर ठेवतील. तसेच या सर्व एक्झिट पोलचे तपशीलवार विश्लेषण तुम्ही आमची अधिकृत वेबसाइट https://marathi.oneindia.com/ वर थेट पाहू शकता.
निकालासाठी पहावी लागेल वाट
20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर सर्व वृत्तवाहिन्या एक्झिट पोल दाखवण्यास सुरुवात करतील.मात्र ते फक्त अंदाज असतात. अनेकदा एक्सिट पोलचे अंदाच साफ चुकल्याचाही इतिहास आहे. त्यामुळे खरा निकाल समजण्यासाठी 23 नोव्हेंबरची वाट पहावी लागणार आहे. निकालासनंतरच महाराष्ट्रात कुणाचे सरकार येईल, हे स्पष्ट समजणार आहे.












Click it and Unblock the Notifications