महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू; कोणत्या मुद्द्यावरुन गाजणार सभागृह
Maharashtra Budget Session 2025, Day Frist : राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तर 10 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत.
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने प्रारंभ
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, सोमवारपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होईल.

पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या जातील
पहिल्याच दिवशी 2024-25 च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार असल्याने, सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष या पुरवणी मागण्यांवर असणार आहे. मुख्य म्हणजे, पुरेसे संख्याबळ हातात नसतानाही राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार आणि मंत्र्याच्या राजीनाम्याबाबत विरोधक नेमकी कोणती भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.
विरोधकांची मुंडे-कोकाटेंवरुन रणनीती
दरम्यान, या अधिवेशन काळात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तसेच कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा, बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट लाटल्याप्रकरणी कोर्टाने 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावलेले माणिकराव कोकाटे या राष्ट्रवादीच्या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आग्रही राहणार आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणासह महिलांच्या सुरक्षेचा मुद्द्यांवरही सरकारला जाब विचारला जाणार असल्याची रणनीती विरोधकांकडून केली जात आहे.
मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोवस्त
मुंबईतील विधानभवनात आज म्हणजेच सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त राखण्यात आला आहे. याशिवाय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळ सचिवालयाची सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 मार्चपर्यंत सुरू राहणार असून सोमवारी 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून कोणत्या घोषणांचा पाऊस पाडण्यात येतो, हा औत्सुक्याचा विषय आहे.












Click it and Unblock the Notifications