maharashtra budget 2025 : पुण्या-मुंबईची वाहतूक अजून जोराने धावणार; मिळाला हजारो करोडचा निधी
अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला. त्यात राज्यातील महत्वकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत महत्वाची घोषणा करण्यात आली. या दोन्ही योजना कधी पूर्ण होतील, सध्या किती काम झालेय याची सविस्तर माहिती अजित पवारांनी दिली.

मुंबईसाठीचे प्रकल्पाचे काय?
चर्चेत असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम याच वर्षी ऑगस्ट महिन्यांपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. याशिवाय वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64 हजार 783 कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
फक्त १ टक्का राहिले समृद्धीचे काम
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा समजल्या जात असलेल्या इगतपूरी ते आमणे या ७६ किलोमिटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल, असे अजित पवारांनी सांगितले. ते म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी 64 हजार 755 कोटी रुपये खर्च झाला आहे. या महामार्गालगत अॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित केले जाईल. त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग व निर्यात हाताळणी अशा केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
मेट्रोचा होणार विस्तार
मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांना वातानुकुलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. येत्या वर्षात मुंबईमध्ये ४१.२ किलोमीटर, तर पुण्यामध्ये २३.२ किलोमीटर असे एकूण ६४.४ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. येत्या ५ वर्षांत एकूण २३७.५ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात 6 हजार 708 कोटी रुपये किंमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिल्याचे अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.
वाहतुकीबाबत पुणेही धावणार
अजित पवारांनी पुण्याबाबत अर्थसंकल्पात भरीव निधीची घोषणा केली. पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यात मेट्रोचा विस्तार
पुणे मेट्रो रेल्वे टप्पा-2 अंतर्गत खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग या दोन मार्गिकांचा 9 हजार 897 कोटी रुपये किंमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications