Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूकीत 'या' दिग्गज नेत्यांना पुन्हा दिली संधी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर भाजपने सर्वात आधी आपल्या 99 उमेदवारांची यादी घोषित करून आघाडी घेतली. त्या पाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर करून आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. या यादीत सर्वच विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली असून अनेक बड्या नावांचा समावेश आहे. नव्या चेहर्‍यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे स्वतः ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी या आपल्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. 2004 सालापासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि अस्सल शिवसैनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव रघुनाथ पाटील यांना जळगाव ग्रामीण मतदार संघाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमदार चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील यांना एरंडोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Shivsena Big Leader

2019 च्या निवडणुकीत अपक्ष लढणारे आणि खडसे परिवाराला आसमान दाखवणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा मुक्ताईनगर मतदारसंघात देण्यात आला आहे. या मतदारसंघात पुन्हा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे तर बुलढाण्यातून संजय गायकवाड, मेहकर मधून संजय रायमुलकर आणि दर्यापूर मधून शिवसेनेचे सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदार संघातही प्रस्थापित आमदारांना आणि नावांना संधी मिळाली आहे.

मराठवाड्यात जैसे थे

अर्जुन खोतकर हे जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे बडे नेतृत्व. देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये ते राज्यमंत्री होते मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी काही काल उद्धव ठाकरे यांना साथ दिली होती. त्यांना जालना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे तर एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांना त्यांचा पारंपरिक सिल्लोड मतदारसंघ देण्यात आला आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते आणि अनेक वेळा आमदार असलेले संजय शिरसाठ यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. याच मतदारसंघातून ते विधानसभेत गेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघात भुजबळ परिवाराला चितपट करणारे आमदार सुहास कांदे यांना पुन्हा संधी मिळाली आहे तर धुळे जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार करणारे मंत्री दादाजी भुसे यांना मालेगाव बाह्य मतदारसंघातून संधी मिळाली आहे.

मुंबईतही विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात

मुंबईत बहुतेक सर्वच विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. पश्चिम उपनगरातून मागाठाणे मधून प्रकाश सुर्वे यांना पुन्हा संधी मिळाली आहे. चांदीवली मधून दिलीप लांडे, कुर्ला येथून मंगेश कुडाळकर, माहीम विधानसभा मतदार संघामधून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना संधी देण्यात आली आहे. मुंबई शहर मध्ये भायखळा येथून विद्यमान आमदार यामिनी यशवंत जाधव याच रिंगणात उतरणार आहेत. रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदार संघामधून महेंद्र थोरवे यांना संधी मिळत आहे.

माहीम मतदारसंघात सदा सरवणकर यांची लढाई मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याशी होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून ओवळा माजिवडा हा पारंपरिक मतदारसंघ प्रताप सरनाईक यांना देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातून अलिबाग विधानसभा मतदारसंघात महेंद्र दळवी पुन्हा रिंगणात उतरले आहेत तर शिवसेनेचे प्रतोद भारत गोगावले यांना महाड मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही विद्यमान पुन्हा मैदानात

पश्चिम महाराष्ट्रातून देखील पुन्हा तेच उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत यात उमरग्यातून ज्ञानराज चौगुले, परांडा विधानसभा मतदारसंघातून मंत्री आणि सहकार सम्राट तानाजी सावंत, सांगोला विधानसभा मतदारसंघातून झाडी आणि डोंगार फेम शहाजीबापू पाटील, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महेश शिंदे, पाटण विधानसभा मतदारसंघातून मंत्री शंभूराजे देसाई यांना संधी देण्यात आली आहे.

बडी नावे कोकणातून

शिवसेनेच्या यादीतील बडी नावे कोकणातून येत आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे 2004 सालापासून नेतृत्व करणारे उदय सामंत हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री होते. त्यांना पुन्हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात संधी मिळाली आहे. त्यांचे बंधू, बांधकाम व्यावसायिक किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. किरण सामंत यांना राजापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तेथे त्यांची लढत शिवसेनेचे सलग तीन वेळा आमदार असलेले राजन साळवी यांच्याशी होण्याची शक्यता आहे.

केसरकर, कदम पारंपारिक मतदारसंघात

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहर चे पालकमंत्री तसेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे 2009 पासून प्रतिनिधित्व करणारे दीपक केसरकर हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. शांत आणि संयमी नेते म्हणून ते ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या राजकारणाला शह देण्याचे श्रेय दीपक केसरकर यांना जाते. त्यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा संधी देण्यात आली आहे तेथे त्यांची लढत भाजपतून बंडखोरी करून उद्धव ठाकरे गटात सहभागी झालेले विधान परिषदेचे माजी आमदार राजन तेली यांच्याशी होणार आहे. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, माजी पर्यावरण मंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना पुन्हा दापोली विधानसभा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.

कोल्हापुरातही तीच स्थिती

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघातून प्रकाश अबिटकर, करवीर विधानसभा मतदारसंघातून चंद्रदीप नरके यांना तर सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघातून सुहास बाबर यांना संधी मिळाली आहे. माझी वनमंत्री संजय राठोड यांना त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेला डिग्रज मतदार संघ देण्यात आला असून एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक संतोष बांगर यांना कळमनुरी मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+