साधा शिपाई ते आमदार शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांचा असा थक्क करणारा प्रवास
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात मुंबई आणि कोकणपाठोपाठ मराठवाड्याने शिवसेनेला चांगली साथ दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बालेकिल्ले उध्वस्त करून सामान्य शिवसैनिकांनी भगवा झेंडा फडकवला. मराठवाड्यातील तरुणाईवर शिवसेनेचा प्रचंड प्रभाव असल्याचे दिसून येते. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला लढा,बाळासाहेबांची हिंदुत्ववादी भाषणे यामुळे मराठवाडा ढवळून निघाला आणि हजारो तरुण शिवसेनेच्या झेंड्याखाली एकवटले. त्यातील एक शिवसैनिक म्हणजे ज्ञानराज चौगुले.
एका संस्थेतला साधा शिपाई आणि साधा शिवसैनिक अशी ज्ञानराज चौगुले ची सुरुवातीची ओळख. शिवसेनेत काम करीत असताना त्यांना सामाजिक कार्याची ओढ लागली आणि हळूहळू त्यांचे नाव होत गेले. 2009 साली मतदार संघाची पुनर्रचना झाली आणि धाराशिव जिल्ह्यात उमरगा लोहारा हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. शिवसेनेने ज्ञानराज चौगुले यांना या अनुसूचित जाती आरक्षित मतदारसंघातून उमेदवारी दिली. 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन निवडणुका विजय मिळवून ज्ञानराज चौगुले यांनी मतदारसंघावर असलेली आपली पकड दाखवून दिली.

तळागाळात संपर्क असणारा नेता
तळागाळात संपर्क असणारा आणि जनतेची नाळ जुळलेला लोकप्रतिनिधी अशी ज्ञानराज चौगुले यांची धाराशिव जिल्ह्यात ख्याती आहे. आणि आमदारकीच्या तिन्ही कालखंडात त्यांनी आपली ही ख्याती अधिकाधिक वाढवलेली आहे.
एकनाथ शिंदे यांना साथ
2019 नंतर महाराष्ट्रात आणि विशेषतः शिवसेनेत अनेक राजकीय उलटफेर झाले. त्यातला सर्वात महत्त्वाचा उलट फेर म्हणजे शिवसेनेत झालेला नेतृत्व बदल. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले आणि या बंडात चाळीस आमदार तसेच आठ मंत्री सहभागी झाले. उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले आणि त्यांच्या हातून पक्ष तसेच चिन्ह देखील निघून गेले. या बंडात एकनाथ शिंदे यांना साथ देणारा आणखी एक शिलेदार होता, तो म्हणजे ज्ञानराज चौगुले.
शिंदे यांच्याशी अधिक सलगी
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्ञानराज चौगुले आणि एकनाथ शिंदे यांची सलगी अधिकच वाढली. मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आमदार म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. आपल्या या सलगीतून ज्ञानराज चौगुले यांनी मतदारसंघात निधीची गंगाच खेचून आणली. धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक निधी खेचून आणणारा आमदार म्हणून आज ज्ञानराज चौगुले यांची ओळख आहे. गाव तांड्यावर बांधलेले रस्ते, सांस्कृतिक सभागृहे आणि सर्वांना सहकार्य यामुळे ज्ञानराज चौगुले यांची लोकप्रियता अजून टिकून आहे.
कोरोनाच्या काळात भरीव काम
कोरोनाच्या काळात ज्ञानराज चौगुले यांनी खूप चांगले काम करून आपल्या मतदारसंघातील मतदारांना आणि नागरिकांना भक्कम आधार दिला. शेकडो लोकांवर वेळीच उपचार करण्यात ज्ञानराज चौगुले यांची सजगता अधिक कारणीभूत ठरली. आपल्या मतदारसंघात जलसंधारणाची कामे अधिक प्रमाणात व्हावी यासाठी देखील ज्ञानराज चौगुले यांनी विशेष प्रयत्न केले. बेनीतुरा उगम ते संगम अशा परिसरात जलसंधारण योजना राबविण्यात आली या योजनेच्या अंतर्गत 34 एफआरपी बंधारे बांधण्यात आले. या योजनेसाठी भरीव निधी राज्य सरकारने मंजूर केला. सुमारे 68 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यात या योजनेमुळे यश मिळाले तसेच दोन लाख 17 हजार 194 क्युबिक मीटर पाणी कर्नाटकात जाण्यापासून रोखण्यास या योजनेमुळे यश मिळाले आहे.
अंतर्गत रस्त्यांसाठी 425 कोटींचा निधी
ज्ञानराज चौगुले यांनी आपल्या उमरगा विधानसभा मतदारसंघात नगर विकासाची कामे देखील चांगल्या पद्धतीने राबवली. उमरगा, लोहारा आणि मुरूम या शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या बांधणीसाठी ज्ञानराज चौगुले यांनी 425 कोटी रुपयांचा निधी प्राप्त केला. उमरगा शहरात सार्वजनिक स्मशानभूमीसाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मिळवण्यात चौगुले यांना यश आले. मराठा आणि धनगर अशा दोन्ही समाजासाठी स्मशानभूमी उभारण्यात आली आहे तसेच उमरगा शहरात विविध ठिकाणी सौंदर्यकरण करण्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी ज्ञानराज चौगुले यांनी खेचून आणला आहे
आरोग्य सुविधांकडेही लक्ष
ज्ञानराज चौगुले यांनी मतदारसंघातील आरोग्य सुविधांकडेही लक्ष दिले आहे. लोहारा तालुक्यातील माकणी आणि काणेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अत्याधुनिक इमारतींसाठी प्रत्येकी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सस्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे चौगुले यांच्या प्रयत्नातून आधुनिकीकरण करण्यात आले आहे आणि त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील आरोग्य केंद्रालाही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे.
सर्व समाजाशी चांगला संपर्क असणारा आणि तळागाळात वावरणारा आमदार अशी ज्ञानराज चौगुले यांची ख्याती आहे. विशेषतः वाडीवस्त्यावर आणि गाव तांड्यावर त्यांचा थेट संपर्क आहे. हा संपर्क ज्ञानराज चौगुले यांना सलग चौथ्या वेळी विधानसभेत यश मिळवून देईल असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.












Click it and Unblock the Notifications