Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'या' 13 मतदारसंघात हायहोल्टेज लढत! अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, युगेंद्र पवार यांच्याकडे सर्वांचे लक्ष

Maharashtra Assembly Election Top 13 Assembly Election Contests : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे हे मुंबईत माहीममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मागच्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी वरळीतून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. आता अमित ठाकरेंच्या उमेदवारीमुळे दोन ठाकरे मुंबईच्या मैदानात आहेत. त्यांच्यासोबतच या 13 मोठ्या लढतींकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

1. माहीम - मुंबई अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत

अमित ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत निवडणूक लढतायत. अमित ठाकरेंच्या विजयासाठी सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून त्यांच्यावर भाजपचे नेते दबाव आणतायत. पण सदा सरवणकर माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आता इथे अमित ठाकरे जिंकणार का? हा मोठा प्रश्न आहे.

Maharashtra Assembly Election Top 13 Assembly Election Contests

2. वरळी - मुंबई आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा विरुद्ध संदीप देशपांडे

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळीमध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव खेळला आहे. आधी काँग्रेसमध्ये असलेले पण आता शिंदेंच्या शिवसेनेत आलेले मिलिंद देवरा वरळीतून निवडणूक लढवतायत. मिलिंद देवरा यांना शिंदे सेनेने आधी राज्यसभेची खासदारकी दिली होती. पण आता त्यांची फारशी इच्छा नसताना त्यांना वरळीमधून लढावं लागतं आहे. मनसेचे संदीप देशपांडे हे आधी आमदारकीला हरले होते पण आता आदित्य ठाकरेंना आव्हान देण्यासाठी तेही मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही लढत अवघड बनली आहे.

3. बारामती - अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार

बारामतीमध्ये काका वि. पुतण्या अशा दोन लढती आहेत. युगेंद्र पवार हे अजितदादांचे सख्खे पुतणे आहेत. अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांचा ते मुलगा. त्यामुळे ही काका-पुतण्याची लढत तर आहेच पण शरद पवार आणि अजित पवार अशीही काका-पुतण्याची पक्षीय लढत इथे आहे. बारामतीचा मतदारसंघ राखणं ही अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे.

4. संगमनेर - बाळासाहेब थोरात विरुद्ध अमोल खताळ

संगमनेरमधून सुजय विखेंचे ऐनवेळी तिकीट कापलं गेलं, ही जागा आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली आहे. तिथं दिग्गज मंत्र्याचा नातू अमोल खताळ यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केले आहे. त्यापुर्वी सुजय विखेंना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. त्यामुळेच आधी थोरात विरुद्ध सुजय विखे ही लढत होईल अशी चिन्ह होती पण सध्या तरी हे घडताना दिसत नाही.

थोरात आणि विखे यांचे वैर जुनेच आणि या मतदारसंघात ते विकोपाला गेलंय. बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्दल सुजय विखेंच्या एका कार्यकर्त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्याविरोधात जयश्री थोरात आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं आणि सुजय विखेंना आव्हान दिलं. सुजय विखे यावेळी इथून उभे राहिले नाही तरीही हा संघर्ष मात्र सुरूच राहणार आहे.

5. कणकवली - राणे बंधूंची लढत, नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर

कुडाळ - निलेश राणे वि. वैभव नाईक

कोकणात राणे बंधू वि. उद्धव ठाकरेंचे उमेदवार असा सामना पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे कमळाच्या चिन्हावर लढले आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात त्यांचा विजय झाला. आता त्यांचा मुलगा नितेश राणे आणि निलेश राणे हे दोघंही विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक आणि संदेश पारकर हे कसं आव्हान देणार ते पाहावं लागेल. राणे बंधूंच्या उमेदवारीमुळे कोकणाचं राजकारण पुन्हा नारायण राणे यांच्या कुटुंबाभोवती फिरतं आहे.

6. नांदगाव - छगन भुजबळांचा पुतण्या समीर भुजबळ अपक्ष लढणार

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ येवल्यामधून निवडणूक लढणार आहेत. त्याचवेळी त्यांचा पुतण्या समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष लढणार आहेत. समीर भुजबळ यांचं हे बंड आहे असं म्हटलं जात असलं तरी त्यांच्या या निर्णयाला छगन भुजबळ यांचा पाठिंबा असावा, असं तज्ज्ञांचं मत आहे. छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ यांची याआधीच विधान परिषेदवर वर्णी लागली आहे.

7. कर्जत-जामखेड - रोहित पवार विरुद्ध राम शिंदे

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कर्जत जामखेड इथे पुन्हा लढत होणार आहे. मागच्या निवडणुकीत रोहित पवार यांनी इथून राम शिंदेंचा पराभव केला होता आणि ते जायंट किलर ठरले होते. त्यामुळे रोहित पवार ही कामगिरी कायम ठेवतात का ते पाहावं लागेल.

8. नवी मुंबई - गणेश नाईक, भाजप - ऐरोली विरुद्ध संदीप नाईक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष - बेलापूर

नवी मुंबईचे बडे राजकारणी गणेश नाईक सध्या भाजपसोबत आहेत. पण त्यांचा मुलगा संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. संदीप नाईक बेलापूरमधून लढतायत. या दोघांचे मतदारसंघ वेगळे असले तरी हे दोघंजण विरोधी पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

9. गडचिरोली - धर्मराव बाबा अत्राम विरुद्ध भाग्यश्री अत्राम वडिल आणि मुलगी यांच्यात लढत

धर्मराव बाबा अत्राम यांच्याविरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री अत्राम लढणार आहे. धर्मराव बाबा अत्राम अजित पवार यांच्या गटात आहेत तर मुलगी शरद पवारांकडून लढणार आहे. 'भाग्यश्री यांनी नवे वडील शोधलेत', अशी टीका धर्मराव बाबा अत्राम यांनी केली आहे.

10. इंदापूर - हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे

इंदापूर मतदारसंघात हर्वर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता तिथे अजित पवार गटाचे उमेदवार दत्ता भरणे आणि शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत होणार आहे.

11. कागल - समरजितसिंग घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ

या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांकडे जे इनकमिंग झालं त्यात समरजितसिंग घाटगे यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. त्यांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता ते अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांना आव्हान देत आहेत.

12. वडगाव शेरी पुणे - सुनील टिंगरे विरुद्ध बापू पठारे

पुण्याचे अजित पवार गटाचे पोर्शे प्रकरणामुळे वादग्रस्त असलेले आमदार सुनील टिंगरे यांना यावेळी तिकिट मिळणार का याची चर्चा होती. पण अजितदादांनी वडगाव शेरीतून त्यांना तिकीट दिलं आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे बापू पठारे रिंगणात आहेत. सुनील टिंगरे यांना पोर्शे प्रकरण भोवणार की ते निवडून येणार ते पाहावं लागेल.

13. भोकरदन आणि कन्नड रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला, संतोष दानवे आणि संजना जाधव

भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे हे भोकरदन मधून निवडणूक लढवतायत. तर त्यांची मुलगी संजना जाधव या शिंदे सेनेकडून कन्नडमधून निवडणूक लढणार, अशी चर्चा आहे. संजना जाधव या कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी आहेत. या दोघांमध्ये मतभेद असल्यामुळे संजना जाधव यांना कन्नडमधून उमेदवारी देण्याचा शिंदे सेनेचा विचार आहे. भोकरदन आणि कन्नड या दोन्ही लढतींमध्ये केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+