दापोलीच्या लढाईत रामदास कदम यांचा वारस दुसऱ्या विजयासाठी सज्ज
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेची स्थापना केली. मुंबईतील मराठी तरुणांचे प्रचंड मोठे संघटन शिवसेनेच्या माध्यमातून उभी राहिले. रोजगाराच्या शोधात कोकणातून मोठ्या संख्येने तरुण मुंबईत येत असतात. या कोकणी तरुणांनी बाळासाहेबांचे नेतृत्व मनोमन स्वीकारले. दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, नारायण राणे अशी कोकणातील अनेक नावे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या नावांशी जोडली गेली. शिवसेनेच्या प्रेमात पडलेल्या आणि संपूर्ण हयात शिवसेनेत घालवणाऱ्या आणखी एका कोकणी नेत्याचे नाव म्हणजे रामदास कदम.
मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरात कार्यक्षेत्र असलेल्या रामदास कदम यांनी संघटनेत आपला स्वतःचा ठसा निर्माण केला. त्यांना खेड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने संधी दिली आणि त्या संधीचे रामदास कदम यांनी सोने केले. खेड, दापोली मंडणगड, गुहागर या परिसरात रामदास कदम यांनी आपला दबदबा निर्माण केला. रामदास कदम यांना पुढे मंत्री पद देण्यात आले. नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदाची धुरा बाळासाहेबांनी मोठ्या विश्वासाने रामदास कदम यांच्या खांद्यावर सोपवली. ती जबाबदारी आपल्या आक्रमक स्वभावाने रामदास कदम यांनी पार पाडली. 2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रामदास कदम हे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहत होते.

योगेश कदम यांचा विधानसभेत प्रवेश
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांची पुढची पिढी म्हणजेच योगेश कदम यांनी दापोली मतदार संघातून राष्ट्रवादीचे संजय कदम यांचा पराभव केला आणि विधानसभेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद पटकावले आणि आपला पुत्र आदित्य ठाकरे यांना देखील कॅबिनेट मंत्रीपद देऊन टाकले. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत रामदास कदम यांना किंवा योगेश कदम यांनाही मंत्रिपद मिळाले नाही. 2022 साली शिवसेनेत उलटफेर झाला आणि चाळीस आमदार तसेच आठ मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून दिले.
रामदास कदम यांचा आक्रमक वारसा
योगेश कदम यांना रामदास कदम यांचा आक्रमक वारसा लाभला आहे. दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदाराचा पराभव करून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. ते प्रतिनिधित्व करीत असलेला दापोली तालुका हा पर्यटन दृष्ट्या खूपच महत्त्वपूर्ण तालुका आहे. दापोली शहर, हर्णै किनारा, आंजर्ले, दाभोळ, चिखलगाव अशी महत्त्वाची पर्यटन स्थळे दापोली मतदारसंघात येतात. कृषी विद्यापीठ देखील दापोली शहरातच आहे. महाराष्ट्रभरातील पर्यटक थंड हवेचा आनंद घेण्यासाठी दापोलीकडे मोठ्या संख्येने धाव घेतात. शहर वजा खेडे असलेल्या दापोलीच्या विकासासाठी योगेश कदम यांनी प्रचंड प्रयत्न केल्याचे गेल्या पाच वर्षात दिसून आले.
मुख्य बाजारपेठेच्या इमारतीची उभारणी
दापोली हे समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेले शहर आहे. पण महामार्गापासून लांब असल्यामुळे येथे वाहतुकीची समस्या रात्री उशिरानंतर निर्माण होते. दापोलीच्या परिसरातील खेडी मुख्य बाजारपेठेसाठी शहरावरच अवलंबून आहेत. या शहरात मुख्य बाजारपेठेची इमारत उभारण्यासाठी योगेश कदम यांनी प्रयत्न केले आणि ती इमारत पूर्णत्वास नेली. मुख्य बाजारपेठेची इमारत पूर्णत्वास गेल्यामुळे स्थानिक भाजी विक्रेते आणि शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला आहे आणि त्यांना त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.
बस स्थानकाची उभारणी
दापोली हे शहर मध्यवर्ती नसले तरी पर्यटनामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून दापोलीकडे बस फेऱ्या सुरू असतात. काही वर्षांपूर्वी पर्यंत दापोलीच्या बस स्थानकाची अवस्था फारच बिकट झाली होती मात्र योगेश कदम यांच्या प्रयत्नातून नवीन बस स्थानक तयार झाले आणि त्याचे काम पूर्णत्वास नेण्यात आले.. नूतनीकरण झालेल्या बस स्थानकामुळे विद्यार्थी, कामगार आणि व्यावसायिकांना लाभ झालेला असून आजूबाजूच्या खेड्यातील नागरिकांची ही चांगलीच सोय झाली आहे.
पर्यटकांची झाली सोय
लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव असलेले चिखलगाव दापोली शहरापासून जवळ आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावर वसलेले दाभोळ हे ठिकाण देखील दापोलीच्या नजीक येते. या दोन्ही ठिकाणी पर्यटकांचा मोठा ओढा असतो. योगेश कदम यांच्या प्रयत्नातून अडखळ ते दापोली हा दुपदरी रस्ता उभारण्यात आला आहे. समुद्राचे मनोहर दर्शन घडवणाऱ्या या रस्त्यामुळे पर्यटकांची चांगलीच सोय झाली आहे. या मार्गावर पर्यटकांची सातत्याने वर्दळ असते आणि त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत.
उपजिल्हा रुग्णालयाची बांधणी
दापोली येथे उपजिल्हा रुग्णालय असावे अशी स्थानिकांची गेल्या कित्येक वर्षापासून ची मागणी होती. योगेश कदम यांच्या प्रयत्नातून ती पूर्णत्वास गेली आणि उपजिल्हा रुग्णालय उभे राहिले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना एक चांगली आणि भरवशाची आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. योगेश कदम यांच्याच प्रयत्नातून दापोली बचत गट बिल्डिंग आणि पंचायत भवन उभारण्यात आले आहे. त्याचाही लाभ स्थानिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
विकासाच्या मुद्यावर रिंगणात
रामदास कदम यांचा शिवसेनेतील आक्रमक वारसा आणि दापोली तसेच परिसरात केलेली विकास कामे या भांडवलावर योगेश कदम आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दापोली मतदारसंघातून रिंगणात उतरत आहेत. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांचे आव्हान आहे. विकास कामांच्या जोरावर योगेश कदम पुन्हा विधानसभेत जातील अशी चर्चा दापोली परिसरातील शिवसैनिकांत ऐकू येत आहे.












Click it and Unblock the Notifications