वैजापूरमध्ये होणार उध्दव ठाकरे गट विरुद्ध शिवसेना लढत!
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्येही राजकीय हालचालींनी जोर धरला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या अचानक एक्झिटने मतदारसंघात चर्चेला उधाण आले.
भाजपचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सध्यातरी डॉ. परदेशी उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. पण, चिकटगावकर जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले तर राष्ट्रवादीकडून ते उमेदवारी मागू शकतात. दरम्यान, महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश बोरणारे पुन्हा उमेदवार असणार हे निश्चित आहे.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून वैजापूरमधील विद्यमान आमदार रमेश बोरणारे यांच्याविरोधात नवा चेहरा उतरवण्याची तयारी सुरू आहे. भाऊसाहेब चिकटगावकर यांनी पक्ष सोडताना दिलेल्या वक्तव्यांमध्ये शिवसेना नेतृत्वाने दिलेला उमेदवारीचा शब्द फिरवल्याचा आरोप केला आहे. चिकटगावकरांच्या मते, पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या डॉ. दिनेश परदेशींना उमेदवारी मिळणार, आणि त्यामुळेच त्यांना वेगळा मार्ग निवडावा लागला.

रमेश बोरणारे यांची कारकीर्द
रमेश बोरणारे हे 2019 मध्ये पहिल्यांदा वैजापूर मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय पाटील यांचा 59,163 मतांनी पराभव केला होता. मात्र, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ईठावानंतर बोरणारे यांनी शिंदेंच्या गटाला समर्थन दिले, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला, पण हा निधी त्यांना आगामी निवडणुकीत कितपत फायद्याचा ठरणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, रस्ते, पाणी, रोजगार, शेतमालाला अल्प भाव या समस्या मतदारसंघात आहेत. त्या सोडविण्यासाठी अधिक काम हवे असल्याच्या प्रतिक्रिया मतदारांनी दिल्या.
आता भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांची भूमिका काय?
भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होते. त्यांनी कौटुंबिक कलहामुळे 2019 च्या निवडणुकीत माघार घेतली होती. मात्र, 2022 मध्ये त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला, पण दोन वर्षांच्या तयारीनंतरही उमेदवारी न मिळण्याच्या शक्यतेमुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. चिकटगावकर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून निवडणुकीत उभे राहतील असे संकेत मिळत आहेत.
डॉ. दिनेश परदेशी यांचा दावा
वैजापूरचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. दिनेश परदेशी यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून विधानसभा उमेदवारीसाठी दावा ठोकला आहे. परदेशी यांची राजकीय कारकीर्द वैजापूर पालिकेत सुरू झाली. त्यांनी गेल्या 25 वर्षांत वैजापूर नगरपालिकेमध्ये एकहाती सत्ता गाजवली आहे. आता ते विधानसभा निवडणुकीच्या शर्यतीत उतरणार आहेत.
जाधव बंधू काय करणार?
वैजापूर मतदारसंघात भाजपच्या जाधव बंधूंचा देखील महत्त्वाचा सहभाग आहे. 2014 मध्ये एकनाथ जाधव यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र मोदी लाटेतही त्यांना यश मिळाले नाही. यंदाच्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या बंधू जे. के. जाधव देखील निवडणुकीत प्रहार पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.
निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे काय असतील
या मतदारसंघात मराठा आणि दलित समाजाची मते निर्णायक आहेत. मराठा आरक्षण हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications