आमच्याकडे ओरिजनल 'माल' चालतो... महिला उमेदवाराबाबत ठाकरे गटाच्या नेत्याचं भलतचं वक्तव्य...
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटले. या वक्तव्यामुळे अरविंद सावंत यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. हे वक्तव्य प्रकरण अंगावर येण्याची चिन्हे दिसल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी नरमाईची भूमिका घेत शायना एनसी या आपल्या मैत्रिण असून त्यांचा अपमान करणार नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, शायना एनसी नागपाडा पोलिस ठाण्यात अरविंद सावंतांविरोधात तक्रार करणासाठी जाणार असल्याचे समजते. शायना एनसी या आपल्यासोबत महिला कार्यकर्त्या घेऊन जात रितसर तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.

अरविंद सावंत यांची ऑडिओ क्लिप व्हायरल
शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवी मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप करत ऑडिओ क्लिप ऐकवली. अरविंद सावंत यांनी मला माल म्हणून संबोधलं, असा आरोप शायना एनसी यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही शायना एनसी यांनी टीका केली. अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर शायना एनसी यांनी संताप व्यक्त करताना एका महिलेचा सन्मान करू शकत नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे.
आरोपानंतर सावंतांची नरमाईची भूमिका
शायना एनसी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याने खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. आरोप वाढल्यानंतर व पोलिसांत तक्रार दाखल होण्याची चिन्हे दिसल्यानंतर सावंतांनी या प्रकाराबाबत स्पष्टीकरण दिले. अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, माझ्या 50 वर्षाच्या राजकीय-सामाजिक आयुष्यात मी कधीही महिलांचा अपमान केला नाही. तर सन्मान केला. शायना एनसी या माझ्या चांगली मैत्रीण आहेत. मी त्यांचा कधी अपमान करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
शायना एनसी पोलिसात जाणार
शायना एनसी यांनी म्हटले होते की, अरविंद सावंत यांची आणि त्यांच्या पक्षाची मनस्थिती यातून दिसते. त्यांची विचारधारा दिसते. एका महिलेला माल म्हणून संबोधतात. मुंबादेवीतील प्रत्येक महिला ही माल आहे का? ज्यांनी तुमच्यासाठी प्रचार केला त्यांच्यासाठी तुम्ही हे बोलत आहात. मोदींचं नाव लावून जिंकून आलेले मला माल म्हणताहेत, अशा शब्दात शायना एनसी यांनी सावंतांना सुनावलं.
उद्धव ठाकरे, शरद पवार गप्प का आहेत. संजय राऊत का बोलत नाहीत. एका महिलेचा सन्मान करू शकत नाहीत? तिच्यासाठी माल शब्द वापरता यातून तुमची मनस्थिती दिसते. महिलेला एक माल म्हणून बघत असाल, तर महाराष्ट्रातील महिला तुम्हाला कधीच मदत करणार नाही. तुम्ही महिलांना माल म्हणालात तर तुमचे हाल होणार, असंही शायना एनसी यांनी म्हटलं आहे. शायना एनसी या सावंतांविरोधात रितसर पोलिस तक्रार देणार आहेत.












Click it and Unblock the Notifications