शिंदे गट, अजित पवार गट आणि मनसेची यादी आज जाहीर होणार, पहा किती जणांची नावे झाली फिक्स!
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. भाजपने काल आपल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर, रणनिती तयार केली. त्यानंतर आता महायुतीतील मित्रपक्षही लगेच कामाला लागले. आज शिंदे गट व अजित पवार गटाची यादीही जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची यादीही राज ठाकरे जाहीर करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारणात जोरदार बदल दिसून येत आहेत. आता महायुती व महाविकास आघाडीच्या याद्या जाहीर झाल्यानंतर बंडखोरी कोण करणार याकडेही लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान
गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने महाराष्ट्र व झारखंडच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.
रविवारी 20 ऑक्टोबरला भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी झाली. या यादीमध्ये 99 जणांचा समावेश आहे. भाजपच्या यादीनंतर काही उमेदवारांमध्ये आनंदाचे तर काहींमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले. भाजपच्या यादीनंतर आता इतर पक्षांकडून त्यांच्या पहिल्या उमेदवारींची यादी जाहीर आजच जाहीर होण्याच्या चर्चा आहेत.
शिंदे गटाची यादीही तयार
भाजपपाठोपाठ शिंदे गटाचीही पहिली उमेदवार यादी तयार झाली आहे. आज या यादीवर शेवटचा विचारविनिमय केला जाणार आहे. त्यानंतरच शिंदे गटाकडून साधारण 30 ते 40 जणांची यादी जाहीर केली जाईल. शिवसेनेत फाटाफूट झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने दोन्ही शिवसेनेत रंगतदार लढती होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्या 40 उमेदवारांची यादी फायनल केली आहे. सकाळी शिंदेगटाची बैठक होऊन त्यानंतर लगेच ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटही झाला सक्रीय
राष्ट्रवादी अजित पवार गटाची यादीही आजच जाहीर केली जाईल, असे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काही उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहेत. आज या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरु केला आहे. त्यांचीही पहिल्या 30 ते 40 उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या अॅक्शन मोडवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंचे निवास्थान असलेल्या शिवतीर्थ या ठिकाणी बैठकांवर बैठका पार पडत आहेत. आज सकाळी राज ठाकरेंनी एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत मनसेच्या उमेदवार निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे मनसेच्या विधानसभा लढणाऱ्या उमेदवारांची यादीच आजच जाहीर होणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.












Click it and Unblock the Notifications