Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बीडची राजकीय गणितं बदलली! विधानसभेला यंदा संदीप क्षीरसागर यांच्याविरुद्ध महायुतीकडून कोण? जाणून घ्या

Maharashtra Assembly Election 2024 :बीड विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरणात प्रचंड उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि महायुतीतील पेच या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांनी या मतदारसंघातील राजकीय गणित बदलली आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ते प्रबळ दावेदार आहेत. सध्या तरी त्यांना स्पर्धक नाही. दरम्यान, महायुतीकडून अनेक जण इच्छुक आहेत. पण, हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार हे महत्त्वाचे आहे.

बीड विधानसभा मतदारसंघातील राजकीय लढत अत्यंत चुरशीची होणार हे नक्की आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, महायुतीतील पेच, मराठा आरक्षण आंदोलन, आणि स्थानिक विकास कामे हे निवडणुकीतील मुख्य मुद्दे असणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Maharashtra Assembly Election 2024 Beed News

महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न

महायुतीतील शिवसेना शिंदे गटाने बीडची जागा मागितली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला येथे पराभवाचा सामना करावा लागला होता, तरीही शिवसेनेने या जागेचा दावा कायम ठेवला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, भाजपचे राजेंद्र मस्के हे महायुतीकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दुसरीकडे, अजित पवार गटाकडून डॉ. योगेश क्षीरसागर आणि बळीराम गवते या नावांचीही चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर संदीप क्षीरसागर शरद पवार गटात राहिले आहेत. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला होता. संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर उमेदवार होते. या लढतीमध्ये संदीप यांना 99 हजार 934 तर जयदत्त क्षीरसागर यांना 97 हजार 950 मते मिळाली.

Take a Poll

साधारण दोन हजार मतांनी जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले. या निवडणुकीपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी नंतर मात्र ते पक्षात फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे २०२२ मध्ये त्यांना शिवसेनेतून काढून टाकले. सध्या जयदत्त क्षीरसागर राजकीय विजनवासातून बाहेर पडत आहेत आणि ते पुन्हा एकदा बीडमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर सहभागी झाले होते, ज्यामुळे दोन्ही काका-पुतण्यांमध्ये पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मतदारसंघनिहाय बैठकांना सुरुवात केली आहे. या बैठकींना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, मराठा समाजाचा प्रभाव बीड विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. जरांगे फॅक्टरकडे कोणताही पक्ष दुर्लक्ष करू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

विकास कामांपेक्षा व्यक्तिगत संबंध महत्वाचे

बीड मतदारसंघात रस्ते, सांडपाणी नाल्या, तसेच इतर विकास कामांवर जरी भर दिला असला तरी सुखदुःखप्रसंगी नेत्यांच्या गाठीभेटींना अधिक महत्त्व दिले जाते. स्थानिक स्तरावर लोकांच्या संपर्कात कोण राहतो, कोण मदत करतो यावर या निवडणुकीत निकाल ठरू शकतो.

मतदारसंघातील जातीवर्गीय समीकरणे

बीड विधानसभा मतदारसंघ हा मराठा आणि वंजारी समाजाच्या मतदारांसाठी ओळखला जातो. या दोन समाजांच्या मतांची कशी विभागणी होते, यावर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. मराठा समाजाचा प्रभाव अधिक असून, जरांगे यांच्या नेतृत्वामुळे मराठा समाजाचा पाठिंबा निर्णायक ठरू शकतो.

महत्त्वाचे इच्छुक

बीड मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर प्रमुख दावेदार आहेत. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून अनिल जगताप, भाजपकडून राजेंद्र मस्के हे इच्छुक आहेत. अजित पवार गटाकडून डॉ. योगेश क्षीरसागर, बळीराम गवते, तर ठाकरे गटाकडून परमेश्वर सातपुते आणि गणेश वरेकर इच्छुक आहेत. याशिवाय, शिवसंग्रामचे डॉ. ज्योती मेटे, जयदत्त क्षीरसागर, सुरेश नवले आणि इतर काही नेतेही इच्छुक आहेत, परंतु, त्यांचा पक्ष अद्याप स्पष्ट नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+