कुर्ल्यातून हॅट्रिकसाठी शिवसेनेचे मंगेश कुडाळकर सज्ज, प्रचाराचा नारळ फुटला
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई शहर आणि पूर्व उपनगरे यांना जोडणारा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून कुर्ला मतदारसंघाची ओळख आहे. संपूर्ण मुंबई शहराचा मध्यवर्ती परिसर, दाट लोकवस्ती, संमिश्र समाज घटक ही कुर्ला मतदारसंघाची वैशिष्ट्ये आहेत. बीकेसी हा विविध आस्थापनांची गर्दी असलेला महत्त्वाचा परिसर एका कुशीला असल्यामुळे कुर्ल्यात सर्वच बाजूने येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली दिसून येते. दाटीवाटीचे रस्ते आणि वाहतूक कोंडी या कुर्ल्याच्या प्रमुख समस्या.
शिवसेनेचे मंगेश कुडाळकर यांनी दोन वेळा जिंकलेला हा मतदारसंघ असून आता 2024 विधानसभा निवडणुकीत मंगेश कुडाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या झेंड्याखाली या मतदारसंघातून भविष्य आजमावत आहेत.
कुडाळकर यांचे मतदारसंघावर वर्चस्व
प्रचंड लोकसंपर्क, धडाडी, वेळा प्रसंगाला मदत करण्याची वृत्ती, कामाच्या वेळी हजर असणारा लोकप्रतिनिधी आणि कुर्ला परिसरात केलेली विकासकामे यांच्या जोरावर या मतदारसंघातून हॅट्रिक साधण्याचा मंगेश कुडाळकर यांचा प्रयत्न आहे. एक साधा शिवसैनिक म्हणून सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीस सुरुवात केलेले मंगेश कुडाळकर आपल्या धडाडीच्या जोरावर आमदारकीपर्यंत पोहोचले.

2014 आणि 2019 अशा सलग दोन निवडणुका जिंकून त्यांनी या मतदारसंघावर असलेले आपले प्रभुत्व दाखवून दिले आहेत. 2022 साली शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीमध्ये कुडाळकर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. एकनाथ शिंदे यांनी कुर्ल्यातून त्यांना उमेदवारी जाहीर केली असून याच मतदारसंघात शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ देखील फुटला आहे. एकनाथ शिंदे हे अत्यंत आक्रमकपणे मंगेश कुडाळकर यांच्यासाठी धडपडताना दिसून येत आहेत.
स्वदेशील मिलच्या कामगारांचा प्रश्न सोडवला
मंगेश कुडाळकर यांचा मतदारसंघातील समस्या सोडविण्याकडे विशेष भर राहिला आहे. त्यांच्या मतदारसंघातील स्वदेशी मिल 24 वर्षापासून बंद आहे. या मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या 24 वर्षांपासून प्रलंबित होता. मिल अवसायानात गेली असून कामगार हवालदील झाले होते. मंगेश कुडाळकर यांनी जातीनिशी प्रयत्न करून कामगारांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्यामुळे हा कामगार वर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे. प्रभाग क्रमांक 151 मध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावर संत रोहिदास उद्यान उड्डाणपूल उभारण्यात आला असून एस जी बर्वे जंक्शनवर होणारी वाहतुकीची कोंडी या उड्डाणपुलामुळे कमी झाली आहे.
टिळक नगर समाज मंदिराची उभारणी
कुर्ला विधानसभा मतदारसंघातील टिळक नगर येथे टिळक नगर समाज मंदिराची उभारणी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पुढाकारातूनच करण्यात आली. 500 आसन क्षमता असलेले हे समाज मंदिर असून शैक्षणिक सांस्कृतिक तसेच लग्नकार्यासाठी एक हक्काचे ठिकाण या समाज मंदिरामुळे स्थानिक नागरिकांना उपलब्ध झाले आहे.
कुर्ला विधानसभा मतदारसंघाच्या नेहरूनगर परिसरात महानगरपालिकेच्या शाळेचे उद्घाटन देखील मंगेश कुडाळकर यांच्या प्रयत्नातून करण्यात आले. यामुळे या परिसरातील सामान्य वर्गातील नागरिकांना माफक दरात शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. शिवसृष्टी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदान या मतदारसंघातील प्रमुख मैदान आहे. आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पाठपुराव्यातून या मैदानाचे सौंदर्यकरण आणि नूतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहराच्या कायापालटाकडे विशेषत्वाने लक्ष दिले आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुंबई शहर सौंदर्यकरण, डीप क्लीन ड्राईव्ह असे अनेक उपक्रम मुख्यमंत्र्यांनी राबवले. डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये स्वतः एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरून शहर स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी झाले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळांचे विद्यार्थी स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांच्या सहभागामुळे या मोहिमेला एका चळवळीचे स्वरूप आले.
मंगेश कुडाळकर यांच्या कुर्ला विधानसभा मतदारसंघात यातील बहुसंख्य उपक्रम राबवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेची प्रचंड लोकप्रियता आहे. राज्यभरातून अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून बहुसंख्य महिलांना लाभाच्या रकमेचे तीन हप्ते अदा करण्यात आले आहेत. कुर्ला विधानसभा मतदारसंघात देखील या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे मंगेश कुडाळकर यांनी लक्ष दिले आहे.
महाविकास आघाडीत धुसफूस
कुर्ला विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी प्रवीणा मोरजकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. लोकसभा निवडणुकीत कुर्ला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी मिळाली असली तरी प्रवीणा मोरजकर यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीत आणि स्थानिक मतदारांत देखील मोठी धुसफूस पाहायला मिळते आहे.
प्रवीणा मोरजकर यांना उमेदवारी दिल्यास त्यांचे काम करणार नाही अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली होती. कुर्ला विधानसभा मतदारसंघ मुस्लिम मतदारांचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मते महाविकास आघाडीला मिळाली होती ती विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळतीलच याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे मंगेश कुडाळकर यांचे पारडे जड मानले जात आहे.












Click it and Unblock the Notifications